रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी मोहल्ला येथे एका मच्छिमाराला आठ जणांच्या जमावाकडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिजवान दाऊद अलबा (वय ३२, रा. केळशी नबी मोहल्ला, ता. दापोली) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.४० वाजण्याच्या सुमारास केळशी मोहल्ला येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ ही घटना घडली. रिजवान आणि रियाज अली बोरकर यांच्यात आधीच्या एका भांडणाच्या कारणावरून वाद झाला होता.

याच वादातून रियाज अली बोरकर याने रिजवानच्या डाव्या डोळ्यावर हाताचा ठोसा मारून दुखापत केली. त्यानंतर रियाजसह कबीर इलियास चाऊस, अली इलियास चाऊस, समीउल्ला फराज चाऊस, इलीयास अली चाऊस, फईम इलियास चाऊस, जमशीद इलियास चाऊस आणि वहीद आशिफ खमसे (सर्व रा. नबी मोहल्ला, केळशी) या इतर आरोपींनी रिजवानला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. यावेळी रियाज बोरकर याने रिजवानला ‘तुला आज संपवतो’ अशी धमकी दिली. हा प्रकार सुरू असताना रिजवानला सोडवण्यासाठी त्याचे मित्र अबरार इस्माईल डायली, रियान इक्बाल चाऊस, नाजीम इक्बाल डायली, त्याचे मेव्हणे मसुद शरीफ बोरकर आणि रिजवानची आई तिथे धावून आले. मात्र, संतप्त आरोपींनी या सर्वांनाही मारहाण केली. या मारहाणीत मसुद बोरकर यांच्या उजव्या गालावर दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर रिजवानने दिलेल्या फिर्यादीवरून २७ ऑगस्ट रोजी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आठही आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) २०२३ चे कलम १८९(२) (बेकायदेशीर जमाव करणे), १९० (बेकायदेशीर जमावाचा सदस्य असणे), ११५(२) (जाणूनबुजून दुखापत करणे), ३५१(२) (गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ (जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन) यानुसार गुन्हा (गु.र.नं. १७१/२०२६) नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.