रत्नागिरी : संगमेश्वरहून उमरेकडे जाणाऱ्या एसटी बसवर अचानक तुटलेली जिवंत विद्युतवाहिनी कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. फणसवणे नाका परिसरातील उमरे फाट्याजवळ बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही अंगावर काटा आणणारी घटना घडली. सुदैवाने बसमध्ये केवळ एकच प्रवासी असल्याने आणि वीजपुरवठा तत्काळ खंडित झाल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत बसच्या महिला वाहकाला विजेचा जोरदार धक्का बसून त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत, तर प्रसंगावधान राखल्यामुळे चालक थोडक्यात बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चालक रवींद्र साप्ते हे सकाळी सात वाजता संगमेश्वर बसस्थानकातून एमएच २० बीएल २१४८ क्रमांकाची बस घेऊन उमरेच्या दिशेने निघाले होते. बस रामदास मिसळ स्टॉलजवळ पोहोचली असता रस्त्यालगतच्या विद्युत खांबाच्या सपोर्टचा ताण तुटून वीजप्रवाह सुरू असलेली वाहिनी थेट बसवर कोसळली. वाहिनी बसवर पडताच संबंधित महिला वाहकाला विजेचा जोरदार धक्का बसला, मात्र त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सीटचा आधार घेतला. नेमक्या त्याच वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांचे प्राण वाचले आणि केवळ किरकोळ दुखापतीवर निभावले. चालक रवींद्र साप्ते हे आपल्या जागेवर अधांतरी स्थितीत असल्याने त्यांचा विजेच्या थेट संपर्कात येण्यापासून बचाव झाला. तसेच, बसमधील एकमेव प्रवासी सीटला टेकून बसला होता आणि त्याच्या पायात चप्पल असल्याने त्यालाही विजेचा धक्का जाणवला नाही. प्रवाशांची संख्या जास्त असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. त्यानंतर लाईनमन होडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत विद्युतवाहिनी हटवली आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला. दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील अनेक भागांत विद्युत खांब आणि तारांची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून, प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी या धोकादायक यंत्रणेची तातडीने पाहणी करून महावितरणने गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.