रत्नागिरी: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक १५ येथे लसीकरण मोहीम उत्साहात पार पडली. या प्रभागात एकूण ९३ बालकांची नोंद असून, या सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यासाठी आरोग्य विभागातर्फे विशेष नियोजन करण्यात आले होते.
या मोहिमेची पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका वर्षा ढेकणे, पदाधिकारी विक्रम जैन आणि सुरेंद्र लांजेकर यांनी लसीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी लसीकरणाचे काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पालकांना आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजण्याचे आवाहन केले. एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहू नये, यासाठी पोलिओमुक्त भारताच्या निर्मितीकरिता राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, परिचारिका आणि आशा सेविकांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील नागरिकांनीही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बालकांच्या आरोग्याबाबत जागरूकता दाखविल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

