दापोली: शहरातील दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूलची रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण हिने एसएससी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशासह विद्यालयाने आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

यावर्षी विद्यालयातून एकूण २६२ विद्यार्थी परीक्षेत बसले होते, त्यापैकी २५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल ९७.३२ टक्के लागला आहे.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण (१०० टक्के) हिने प्रथम क्रमांक मिळवला. त्याखालोखाल नील उदय फडके (९६.२० टक्के) द्वितीय, क्रांति विरेंद्र केळस्कर (९५.४० टक्के) तृतीय, पल्लवी विजय भुवड (९४.८० टक्के) चौथी, तर सई आशिष शिगवण (९४.६० टक्के) पाचव्या क्रमांकावर आहे.

विशेष म्हणजे विद्यालयातील ४८ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रसाद करमरकर, कार्यवाह विनोद जोशी, सर्व संचालक मंडळ, शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर, सदस्य श्रीकांत निजामपूरकर, स्मिता सुर्वे, मुख्याध्यापक एस.एम. कांबळे, उपमुख्याध्यापक अर्जुन घुले, पर्यवेक्षक अनिल पेठकर, एस.आय. मगदूम, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून कौतुक होत आहे.