रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड पोलीस ठाण्यात १९९२ मध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तब्बल ३४ वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन फरार आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश आले आहे.
कर्नाटक राज्यातील हुन्सूर परिसरातून या दोन्ही आरोपींना १७ ऑक्टोबर २०२६ रोजी अटक करण्यात आली असून, या तपासात रत्नागिरी पोलिसांनी विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ‘RAIDS’ ॲपची अत्यंत प्रभावी मदत झाली आहे.
मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४२९, २८६ आणि स्फोटक पदार्थ अधिनियम कलम ५ अन्वये दाखल असलेल्या या प्रकरणात मधुराज पुटरंग पहाडी राजपूत आणि सुब्रमणी चींनाराजू पहाडी राजपूत (दोघे रा. हुन्सूर पक्षी, राजपूर, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने १५ डिसेंबर २०२५ रोजी हे एआय आधारित ‘RAIDS’ ॲप विकसित केले होते. या ॲपच्या माध्यमातून पाहिजे असलेले फरार आरोपी तसेच हरवलेल्या व्यक्तींच्या जुन्या छायाचित्रांचे १०८ विविध तांत्रिक पद्धतींनी पुनर्निर्माण करता येते.
याच ॲपचा वापर करून आरोपींच्या छायाचित्रांचे अचूक पुनर्निर्माण करण्यात आले आणि स्थानिक व गोपनीय माहितीच्या आधारे कर्नाटकातून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस हवालदार विनायक राजवैद्य, सवाईराम, कदम आणि शेटे यांच्या पथकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही यशस्वी कारवाई केली.

