रत्नागिरी : शहरातील वरचा फगरवठार येथे अनधिकृतपणे वृक्षतोड आणि उत्खनन केल्यामुळे रस्त्यालगतची कॉंक्रीटची संरक्षण भिंत व रस्ता ढासळून सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत रत्नागिरी नगरपरिषदेने कठोर पावले उचलली असून, संबंधित जमीनमालक आणि उत्खनन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे लेखी पत्र दिले आहे.

मौजे झाडगाव म्युनिसिपल हद्दीतील स.नं. ३७६/अ/३/४/२ येथील जमीनमालक जितेंद्र अनंत शेट्ये यांच्या जागेतील धोकादायक झाडे तोडण्यासाठी शुभम सुहास कांबळे याने १९ जून २०२६ रोजी नगरपरिषदेकडे परवानगी मागितली होती.

मात्र, नगरपरिषदेने या वृक्षतोडीस कोणतीही अधिकृत परवानगी दिली नव्हती. असे असतानाही शुभम कांबळे याने त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे वृक्षतोड आणि उत्खनन केले. या अनधिकृत कामामुळे परिसरातील रहदारीस अडथळा निर्माण झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती.

या तक्रारीनंतर २ सप्टेंबर २०२६ रोजी नगरपरिषदेच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान रस्त्याच्या बाजूस असलेली सुमारे अडीच फूट रुंदीची कॉंक्रीटची संरक्षण भिंत आणि रस्ता ढासळल्याचे उघड झाले.

या बेकायदेशीर कृत्यामुळे नगरपरिषदेच्या सार्वजनिक मालमत्तेचे गंभीर नुकसान झाले असून नागरिकांच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी रत्नागिरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम २९६ अन्वये जमीनमालक जितेंद्र अनंत शेट्ये आणि शुभम सुहास कांबळे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची विनंती रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे.

या कारवाईसाठी दिलेल्या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांनाही माहिती व पुढील योग्य त्या कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.