रत्नागिरी जिल्ह्याचा महाराष्ट्रातील भव्य राखी प्रधान सोहळ्यात अभिमानास्पद ठसा

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चातर्फे २३ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित भव्य राखी प्रधान सोहळा महाराष्ट्रात उत्साहात आणि दणक्यात पार पडला. या सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याने कोकण-ठाणे विभागात प्रथम क्रमांक पटकावताना महाराष्ट्रातील ८० संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये तिसरा क्रमांक मिळवून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा नावलौकिक महाराष्ट्रभर पसरला आहे.

या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा ढेकणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संपूर्ण महाराष्ट्रभर झाले, ज्यामुळे या सोहळ्याची भव्यता आणखी वाढली.

रत्नागिरी जिल्ह्याच्या या यशाचे श्रेय जिल्हा महिला मोर्चाच्या बळकट संघटनेला आणि वर्षा ढेकणे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांना जाते. रत्नागिरी शहराने विक्रमी संख्येने राख्या जमा करून आघाडी घेतली, तर जिल्ह्यातील अकरा मंडलांमधूनही उत्कृष्ट संकलन झाले. नुपूर मुळ्ये, श्रुती ताम्हणकर, शीतल रानडे, प्रभावती कानडे, अश्विनी वरवडेकर, रसिका देवळेकर, अनिता राजे-शिर्के, जया केतकर, प्रियल जोशी, शितल दिंडे, वैष्णवी चव्हाण, स्नेहा चव्हाण, धृवी लाकडे, सारिका भावे, सुचिता ढेकणे, श्रद्धा इंदुलकर, रूपाली कदम, पल्लवी पाटील, सुप्रिया रसाळ, संपदा तळेकर, भक्ती दळी, रेणुका गुंडये यांसारख्या कार्यकर्त्यांनी या यशात मोलाचा वाटा उचलला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्यात महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महिलांच्या योगदानाला संघटनेची खरी ताकद ठरवत त्यांचा गौरव केला. तसेच, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी “महिला उभी राहिली तर समाज उभा राहतो,” असे प्रभावी मार्गदर्शन करत महिला सक्षमीकरणावर जोर दिला.

रत्नागिरी जिल्ह्याने मिळवलेला हा मान संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. या सोहळ्यातील प्रचंड उपस्थिती, जोशपूर्ण वातावरण आणि रत्नागिरीचा ठसा यामुळे हा कार्यक्रम महाराष्ट्रातील उत्कृष्ट कार्यक्रम म्हणून नोंदला गेला. पुढील प्रवासात ही ताकद आणि उत्साह रत्नागिरी जिल्ह्याला नवी ऊर्जा देणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*