रत्नागिरीः- 35 वर्षीय स्वप्निल जाधव यांचं रविवारी हृदयविकाराच्या झटक्यांना निधन झालं. ते संगमेश्वर पोलीस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून कार्यरत होते.

त्यांना तातडीने रत्नागिरी येथे हलवण्यात आलं तेथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी कोल्हापूराला नेत असताना दख्खीण येथे त्यांना हृदयविकाराचा दुसरा झटका आला.

त्यांना तत्काळ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले गेले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

स्वप्निल जाधव हे अनुकंपाखाली १० वर्षांपूर्वी पोलिस खात्यात रुजू झाले होते. ते दोन वर्षापूर्वी संगमेश्वर पोलिस ठाण्यात बदलीने आले होते. रविवारी कामावर असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.

साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जाधव यांच्या मुळगावी रत्नागिरी मिऱ्या येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जाधव यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.