रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, सत्कोंडी यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ‘नवकवींसाठी काव्यलेखन कार्यशाळा’ बुधवारी, १४ ऑक्टोबर रोजी सत्कोंडी येथील स्व. अनंतरावजी बैकर बहुउद्देशीय संकुलात उत्साहात संपन्न झाली.

या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन आणि प्रमुख मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सत्कोंडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सतिश थुळ यांनी भूषवले.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून केशवसुत स्मारक समिती मालगुंडचे अध्यक्ष गजानन तथा आबासाहेब पाटील, कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, गणपतीपुळे बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, जांभारीच्या केंद्र प्रमुख परब मॅडम, कोमसाप रत्नागिरी जिल्हा सचिव मुश्ताक खान आणि कोमसाप मालगुंड शाखाध्यक्ष नलीनी खेर उपस्थित होते.

या कार्यशाळेत आद्यगझलकार देविदास पाटील, कोमसाप दक्षिण कोकण विभागाचे युवाशक्ती प्रमुख अरुण मोर्ये, युवा गझलकार राजू सुर्वे आणि रत्नागिरी जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य प्रा. शिवराज गोपाळे यांनी मान्यवर वक्ते म्हणून उपस्थित राहून कवितेचे विविध पैलू उलगडून सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय बैकर यांनी बीजभाषण केले.

यावेळी ग्रंथदिंडी आणि पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात सर्व मान्यवरांचा स्वागत सन्मान करण्यात आला.

तसेच, अरुण मोर्ये यांना त्यांच्या ‘कृष्णा माझं काय चुकलं’ या पुस्तकासाठी कोमसापचा नाट्य विभागातील भाई भगत नाट्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

या कार्यशाळेला जिल्ह्यातील ४४ प्रशिक्षणार्थी आणि शिक्षक उपस्थित होते, ज्यांच्यासाठी प्रत्यक्ष एका तासाचे सराव सत्रही घेण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर आणि नीटनेटके असल्याचे गौरवोद्गार काढत, पुढील वर्षाचे जिल्हा साहित्य संमेलन सत्कोंडी येथेच होईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा डॉ. प्रदीप ढवळ यांनी यावेळी केली.