रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा करत दापोली येथील स्मिताली संदीप राजपुरे यांनी सुधीर महादेव कालेकर यांच्या नावाला मतदार यादीतून वगळण्याची मागणी केली आहे.
स्मिताली संदीप राजपुरे यांनी नवी मुंबई येथील कोकण विभागाच्या विभागीय सहनिबंधक आणि जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम ९ अंतर्गत हा लेखी आक्षेप नोंदवला आहे.
प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि धान्य अधिकोष सहकारी संस्था मतदारसंघाच्या तात्पुरत्या मतदार यादीत सुधीर महादेव कालेकर यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.
या समावेशाला आव्हान देताना स्मिताली संदीप राजपुरे यांनी म्हटले आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ग्रामीण सहकारी बँक प्रशासन सुधारणा निर्देश २०२६ नुसार, कोणत्याही व्यक्तीला बँकेच्या संचालक मंडळावर सलग दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षांचा कूलिंग-ऑफ कालावधी पूर्ण करणे अनिवार्य आहे.
सुधीर महादेव कालेकर यांनी सलग दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असूनही या अनिवार्य कालावधीचे पालन केलेले नाही, त्यामुळे ते मतदार, प्रतिनिधी किंवा उमेदवार म्हणून अपात्र ठरतात.
बँकेच्या वार्षिक अहवालाचा पुरावा जोडत स्मिताली संदीप राजपुरे यांनी कालेकर यांचे नाव तात्पुरत्या मतदार यादीतून तत्काळ रद्द करण्याची आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यापासून रोखण्याची मागणी केली आहे.
तसेच, ३ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सतीश जाधव विरुद्ध रिझर्व्ह बँक प्रकरणात आरबीआयच्या परिपत्रकाची दखल घेत दिलेल्या निकालाचा संदर्भही या आक्षेप अर्जात देण्यात आला आहे.
या कायदेशीर प्रक्रियेत स्मिताली संदीप राजपुरे यांच्या वतीने जयसिंग एम. बांगर हे वकील म्हणून कामकाज पाहत आहेत.

