दापोली : तालुक्यातील आंजर्ले ग्रामपंचायतीच्या शेजारी असलेल्या तरीबंदर परिसरात आज बोटींना अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली.

आग लागल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की, आगीचे लोट दूरवरून दिसत होते. घटनेची माहिती मिळताच आंजर्ले येथील ग्रामस्थांनी तातडीने तरीबंदर परिसराकडे धाव घेतली.

घटनास्थळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी आणि पुढील नुकसान टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

या आगीत बोटींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत असून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणेला या घटनेची माहिती देण्यात आली आहे.