दापोली : दापोली पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून महेश महादेव तोरस्कर यांनी शनिवार, २८ जून २०२५ रोजी पदभार स्वीकारला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे-जांभूळगाव येथील रहिवासी असलेले तोरस्कर यांना पोलीस दलात २५ वर्षांचा समृद्ध अनुभव आहे.

शिस्तप्रिय आणि कार्यकुशल अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.

यापूर्वी तोरस्कर यांनी देवरूख येथे दोन महिने पोलीस निरीक्षक म्हणून कार्य केले.

तसेच, त्यांनी मुंबईतील सायन येथे २०११ ते २०१४ पर्यंत पोलीस उपनिरीक्षक, ट्रॉम्बे येथे २०१४ ते २०१७ पर्यंत सहाय्यक पोलीस निरीक्षक, क्राइम ब्रँच युनिट-६ येथे २०१७ ते २०२२ पर्यंत, आणि वडाळा टीटी येथे २०२२ ते २०२३ पर्यंत पोलीस निरीक्षक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली.

त्यानंतर २०२३ ते २०२४ मध्ये रत्नागिरी शहरात आणि जिल्हा वाहतूक शाखेत तीन ते चार महिने सेवा बजावली.

पनवेल शहर, कळंबोली यासह इतर ठिकाणीही त्यांनी आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली आहे.

दापोलीत पदभार स्वीकारल्यानंतर, तोरस्कर यांनी स्थानिक नागरिकांना कायदा, सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

तसेच, अमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक कठोर करण्याचा आणि सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.