रत्नागिरी : महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या जलतरणपटूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ५ आणि ७ जुलै रोजी झालेल्या माणगाव (रायगड) आणि बारामती येथील दोन मोठ्या जलतरण स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
या दोन्ही स्पर्धांमध्ये खेळाडूंनी पदके आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकून आपल्या ग्रुपचा दबदबा निर्माण केला. ७ जुलै रोजी मानगाव येथे पार पडलेल्या बीटी स्पोर्ट्स जलतरण चॅम्पियनशिपमध्ये तनया मिलके हिने ५ सुवर्णपदकांसह चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
याच स्पर्धेत निधी भिडे हिने देखील ३ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्यपदक मिळवून चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. याशिवाय इतर खेळाडूंनीही पदकांचा पाऊस पाडला.
करण मिलके याने ५ रौप्य आणि आयुष काळे याने ४ रौप्यपदके मिळवली. आयुष काटले याने २ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्यपदक जिंकले, तर सान्वी पवार हिने १ सुवर्ण व १ रौप्यपदकावर मोहोर उमटवली.
अर्णव पिळणकर याने ४ रौप्य व १ कांस्य, इझहान कापडे (सिनियर) याने १ सुवर्ण, आरोही पिळणकर हिने २ रौप्य व ३ कांस्य, नाझिफा मांगा हिने २ रौप्य व १ कांस्य, परी जैन हिने १ कांस्य आणि अव्यन जांभोरे याने १ रौप्यपदक मिळवून ग्रुपच्या यशात मोलाची भर घातली.
तसेच, इझहान कापडे (ज्युनिअर) याने २५ मीटर फ्रीस्टाईलमध्ये चमकदार कामगिरी केली असून रिधेश हरचेकर, शौर्य राऊत, अधिराज कवितके, आद्या कवितके आणि पार्श्व जैन यांनी या स्पर्धेत उत्कृष्ट सहभाग नोंदवून आपली क्षमता सिद्ध केली.
तत्पूर्वी, ५ जुलै रोजी झालेल्या बारामती जलतरण स्पर्धेतही या ग्रुपने आपली छाप सोडली. या स्पर्धेत निधी भिडे हिने अप्रतिम कामगिरी करत ५० मीटर, १०० मीटर आणि २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात ३ सुवर्णपदके पटकावली.
माणगाव आणि बारामती येथील या दोन्ही स्पर्धांमधील ऐतिहासिक यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक महेश मिलके यांच्यासह सर्व यशस्वी खेळाडू आणि त्यांच्या पालकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

