गुहागर : हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुहागर पंचायत समिती, तालुका कृषी विभाग आणि उमराठ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने उमराठ येथे १ जुलै रोजी कृषिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून स्थानिक बचत गटाच्या माध्यमातून तब्बल १० एकर क्षेत्रावर सामूहिक शेतीचा पथदर्शी आणि यशस्वी प्रयोग हाती घेण्यात आला असल्याची माहिती पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर यांनी दिली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, जिल्हा परिषद सदस्या अपूर्वा बारगोडे, नेत्रा ठाकूर, पंचायत समिती सदस्य संदिप गोरीवले, गौरव वेल्हाळ, मानसी रांगळे आणि उमराठचे प्रशासक जनार्दन आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषिदिनानिमित्त उमराठ ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. आधुनिक तसेच सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना ‘गोकृपा अमृतम’ तयार करण्याचे थेट प्रात्यक्षिक याप्रसंगी करून दाखवण्यात आले.

यावेळी उपसभापती निलेश सुर्वे आणि जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. याशिवाय गावातील बचत गटांच्या माध्यमातून सामूहिक शेतावर नाचणी आणि विविध फळभाजी पिकांच्या लागवडीचा शुभारंभ देखील करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, कृषी अधिकारी कृष्णदेव कदम, मंडळ कृषी अधिकारी नाले, सर्जेराव कांबळे, मंगेश पिंगळे, विस्तार अधिकारी प्रतीक जाधव आणि कृषी पर्यवेक्षक कुसाळकर यांच्यासह सर्व सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते.

तसेच स्थानिक ग्रामस्थ अनिल पवार, भिकु मालप, शांताराम गोरीवले, संदीप गावणंग, विनायक कदम, नारायण गावणंग, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णा गोरीवले, पोलीस पाटील वासंती आंबेकर यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर यांनी मांडली, तर सूत्रसंचालन उमराठचे ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश लेंडवे यांनी केले.

