दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प ‘कृषि आणि संबधित क्षेत्रातील श्रमविज्ञान आणि सुरक्षितता’ या संशोधन केंद्राला सन २०२५-२६ या वर्षासाठी देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार जाहीर झाला आहे.
भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत कार्यरत असलेल्या या केंद्राने संशोधन, तंत्रज्ञान विकास, शेतकरी हिताची उपकरणे निर्मिती, प्रशिक्षण आणि विस्तार कार्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सन्मान मिळाला आहे.
आगामी वार्षिक कार्यशाळेत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या कार्यशाळेदरम्यान केंद्राचे प्रकल्प अन्वेषक प्रा. डॉ. विजय आवारे यांनी संशोधन कार्य आणि उपक्रमांचे सादरीकरण केले, ज्याची आयसीएआरच्या अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली. प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. सुखबीर सिंग यांनी ई-मेलद्वारे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांचे अभिनंदन केले.
या यशावर प्रतिक्रिया देताना कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी संपूर्ण विद्यापीठासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगत भविष्यातही शेतकरी-केंद्रीत संशोधन आणि कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्याचा पुनरुच्चार केला.
सन २००९ पासून कार्यरत असलेले हे केंद्र शेतमजुरांचे श्रम कमी करणे, कार्यक्षमता वाढवणे आणि महिला शेतमजुरांसाठी उपयुक्त व सुरक्षित साधने विकसित करण्याचे काम करत आहे. केंद्राने विकसित केलेले ‘कोकण प्रसन्ना’, भात लावणी यंत्र आणि नाचणी मळणी-सडणी यंत्र यांसारखी उपकरणे शेतकरी व महिला शेतमजूर मोठ्या प्रमाणात वापरत असून त्यांच्या अनेक डिझाईन्सना भारतीय पेटंट कार्यालयाकडून मान्यता मिळाली आहे.
ही यंत्रे विक्री व भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासोबतच महिला बचत गट, शेतकरी आणि उद्योजकांसाठी प्रशिक्षण शिबिरे, प्रात्यक्षिके व प्रदर्शनांच्या माध्यमातून गावागावांत पोहोचवण्यात आली आहेत.
या राष्ट्रीय सन्मानामागे विद्यापीठ प्रशासन, वैज्ञानिक, तांत्रिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सांघिक प्रयत्न असल्याचे प्रा. डॉ. विजय आवारे यांनी स्पष्ट केले.

