रत्नागिरी : महसूल गोळा करणे हे महसूल विभागाचे प्राथमिक आणि सर्वात महत्त्वाचे कर्तव्य असून यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. शासकीय महसूल आणि गौण खनिज वसुलीची सद्यस्थिती अजिबात समाधानकारक नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून न राहता प्रत्यक्ष फिल्डवर उतरून बेकायदेशीर प्रकारांवर दंडात्मक कारवाया कराव्यात, असे कडक निर्देश कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिले आहेत.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महत्त्वपूर्ण महसूल आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर आयुक्त फरोग मुकादम, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, वैशाली पाटील, आकाश लिगाडे, डॉ. विजय सूर्यवंशी, विश्वजीत गाताडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार उपस्थित होते.
गौण खनिज आणि महसूल वसुलीच्या संथ गतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत रुबल अगरवाल यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. जिल्ह्यात अपेक्षित काम झालेले नाही, याचा अर्थ सर्व काही नियमानुसार सुरू आहे का, असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अधिकाऱ्यांच्या मूळ कामातच ढिलाई दिसत असून ही कार्यपद्धती तातडीने सुधारण्याची तंबी त्यांनी दिली. अर्धवट राहिलेली कामे आणि प्रलंबित केसेसची संख्या तातडीने शून्यावर आणण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत.
नागरिकांना आपल्या कामांसाठी वरिष्ठ कार्यालये अथवा मंत्र्यांकडे हेलपाटे मारायला लागू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवरच पुढाकार घेऊन सर्व प्रकरणांचा निपटारा करण्याच्या सूचना रुबल अगरवाल यांनी दिल्या.
या बैठकीत आंबा-काजू नुकसान भरपाई अनुदान वाटप, ॲग्रीस्टॅकची कामे, बीएसएनएल टॉवर जागा वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना, नवीन वाळू धोरण, अतिक्रमण नियमानुकूल करणे, वन क्षेत्राच्या नोंदी आणि लँड बँक निर्मिती यांसारख्या विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीच्या सुरुवातीला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पोलीस विभागाच्या ‘मिशन राईझिंग’ अंतर्गत अधिनिर्णय, मिशन जीवन, रेड्स ॲप, मिशन रॅपिड, फिनिक्स प्रगती, प्रतिसाद या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित डिजिटल उपक्रमांचे आणि सायबर गुन्हे नियंत्रणाचे सादरीकरण केले.
या अभिनव प्रयोगांचे कौतुक करत रुबल अगरवाल यांनी पोलिसांच्या कामाची प्रशंसा केली आणि शासनाच्या नशामुक्ती अभियानावर अधिक भर देण्याचे आवाहन केले.
याव्यतिरिक्त, २६६-रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘स्वीप’ मोहिमेच्या फलकाचे प्रदर्शनही करण्यात आले.
‘प्रारूप मतदार यादीमध्ये माझे नाव समाविष्ट झाले आहे; तुम्ही तुमच्या नावाची पडताळणी केलीत का?’ असा संदेश देणाऱ्या या जनजागृती फलकावर रुबल अगरवाल, मनुज जिंदल, वैदेही रानडे, सहायक पोलीस अधीक्षक आकांशा यादव आणि इतर अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या करून नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदवण्याचे आवाहन केले.

