रत्नागिरी : चार दशकांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या (कै.) मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत यंदा युवा वक्त्यांनी आपल्या प्रभावी आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने व्यासपीठ गाजवले.

२९ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल १५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गटात पुणे विद्यापीठाच्या शिवम संदीप जाधव याने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा किताब मिळवला.

जेधे महाविद्यालयाचा अनिकेत रामा वनारे द्वितीय, तर मुंबई विद्यापीठाचा अभय कृषिकांत आळशे तृतीय ठरला.

वारजे माळवाडी येथील कला वाणिज्य महाविद्यालयाचा भगवंत रामचंद्र कोळी आणि लांजाच्या एसकेएसव्ही कॉलेजचा अथर्व विवेक पाध्ये यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवले.

या वरिष्ठ गटाचा सांघिक चषक लांजाच्या एसकेएसव्ही कॉलेजने पटकावला. जिल्हास्तरीय माध्यमिक मराठी गटात नवनिर्माण हायस्कूलची संस्कृती शांताराम कोकरे हिने प्रथम, फाटक हायस्कूलची तपस्या गुरुप्रसाद बोरकर हिने द्वितीय, तर पडवे येथील केंद्रीय नवोदय विद्यालयाची आर्या उदय यादव हिने तृतीय क्रमांक मिळवला.

डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलची देवता प्रमोद पाटील आणि साडवलीच्या मीनाताई ठाकरे हायस्कूलची पंकजा उत्रेश्वर गीते यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.

इंग्रजी माध्यम माध्यमिक गटात कासारवाडीच्या एसव्हीआयसीटी इंग्लिश मीडियम स्कूलची ग्रीष्मा अजित नोंदोस्कर प्रथम, रत्नागिरीच्या नवनिर्माण हायस्कूलची आफ्रा मुदस्सर डिंगणकर द्वितीय आणि दापोलीच्या संतोष भाई मेहता स्कूलची जान्हवी काशीराम देवघरे तृतीय ठरली.

नवनिर्माणची तीर्था संदिप नाखरेकर आणि संतोष भाई मेहता स्कूलची रिद्धी दत्ताराम चौगले यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.

कनिष्ठ महाविद्यालयीन गटात रत्नागिरीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कॉलेजची राधा समीर पाटणकर प्रथम, नवनिर्माणची विधी सत्यजित कापडी द्वितीय आणि लवेल-खेडच्या अण्णासाहेब बेहरे कॉलेजचा नीरज प्रफुल तलाठी तृतीय ठरला. वी. स. गांगण ज्युनिअर कॉलेजची बिलवा गणेश रानडे व बोरज खेडच्या ज्ञानदीप कॉलेजची श्रेया कृष्णा मेस्त्री यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.

या गटाचा सांघिक चषक नवनिर्माण महाविद्यालयाने जिंकला. स्पर्धेचे उद्घाटन राजापूरच्या नगराध्यक्षा हुस्नबानू खलिपे यांच्या हस्ते झाले, तर बक्षीस वितरण न्यूज 18 मराठी चॅनेलचे संपादक मंदार फणसे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालक अलिमिया परकार आणि संचालिका सीमा हेगशेट्ये उपस्थित होते.