रत्नागिरी: भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने आयोजित भव्य मंगळागौर स्पर्धा व सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात आणि दणक्यात संपन्न झाला.

रत्नागिरी जिल्ह्यात महिलांसाठी एवढ्या भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन करत महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि मनोरंजनाने भरलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.

देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, रत्नागिरी संपर्क मंत्री नितेश राणे, भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार ठरले.

कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व कलाकारांनी भाजप महिला मोर्चाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा वर्षा परशुराम ढेकणे, महिला मोर्चा कार्यकारिणी तसेच शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे व कार्यक्षम नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक केले.

महिलांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे वर्षा ढेकणे यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी असल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.

हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन, पारंपरिक खेळांचे संवर्धन आणि महिला शक्तीच्या एकतेचे प्रभावी दर्शन घडविणारा ठरला.

कार्यक्रमाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे उपस्थित महिला आणि नागरिक भारावून गेले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमादरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या तसेच भाजप सरकारच्या महिलांसाठी असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या अधिक सक्षम व स्वावलंबी व्हावे, यासाठी सविस्तर मार्गदर्शनही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी रत्नागिरी जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व महिला पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, मंडल अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आणि सहकार्य करणाऱ्या सर्व महिलांचे आभार मानले.

हा सोहळा केवळ एका व्यक्तीच्या नव्हे तर भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आणि महिलांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यापुढील काळातही सर्वांनी एकजुटीने काम करून भाजपची विचारधारा घराघरात पोहोचवण्याचा तसेच रत्नागिरी जिल्ह्यात महिला मोर्चाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एक नवा आदर्श निर्माण झाला असून या उपक्रमाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.