चिपळूण: राज्य शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०२४ चा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे विविध प्रजातींची तब्बल ४५ हजार वृक्षांची वनराई उभारणाऱ्या ज्योती रामदास कदम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
कोकण विभागातून प्रथम क्रमांक पटकावत त्यांनी राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला आहे. माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री ज्योती कदम यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे मंडणगड तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखालील वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास राव, सामाजिक वनीकरणचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर आणि मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर या राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने सामाजिक वनीकरण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यातील विजेत्यांची निवड केली.
या पुरस्कार विजेत्यांच्या यादीमध्ये मंडणगड तालुक्यातील सोवेली येथील ज्योती रामदास कदम यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
कदम यांनी ‘ज्योती निसर्ग बंधन वनराई’ या उपक्रमाच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे गेल्या पाच वर्षांपासून फळझाडे, वनझाडे आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींसह तब्बल ४५ हजार वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या या यशस्वी आणि सातत्यपूर्ण पर्यावरणपूरक कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविले आहे.

