चिपळूण अधिवेशनात जीवन सुर्वे यांची राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती

चिपळूण: चिपळूण येथील शिक्षक पतपेढी सभागृहात आज संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात दापोलीचे शिक्षक नेते जीवन सुर्वे यांची राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रीय नेते संभाजीराव थोरात ऊर्फ तात्या यांनी सभागृहात या नियुक्तीची घोषणा केली. संघटनात्मक क्षेत्रात गेले 30 वर्षांहून अधिक काळ जीवन सुर्वे यांनी केलेल्या सेवेची पोहोचपावती म्हणून हे अत्यंत मानाचे व प्रतिष्ठेचे पद त्यांना प्रदान करण्यात आल्याचे तात्यांनी यावेळी सांगितले.

जीवन सुर्वे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले की, राष्ट्रीय प्रवक्तेपदी झालेली नियुक्ती ही आपल्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान आहे.

दापोलीतील सर्व प्राथमिक शिक्षक बंधू-भगिनी तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षक संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि राज्य पदाधिकाऱ्यांनी आजवर दिलेली समर्थ साथ व समर्थन यामुळेच आपण या पदापर्यंत पोहोचू शकलो, असे त्यांनी नमूद केले.

या नियुक्तीनंतर राज्यमंत्री नामदार योगेश कदम तसेच पालकमंत्री आदरणीय उदय सामंत यांनी जीवन सुर्वे यांचे विशेष अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

सुर्वे यांनी सांगितले की, या पदाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू.

तसेच, या पदावर आपली नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय नेते संभाजीराव थोरात ऊर्फ तात्या आणि राष्ट्रीय व राज्य कार्यकारणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*