दापोली: जेसीआय दापोलीतर्फे आयोजित ‘जेसीआय दापोली मॅरेथॉन २०२६ – सिझन ३’ ही स्पर्धा शनिवारी आझाद मैदान, दापोली येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

‘रन फॉर पीस, रन फॉर दापोली’ असा शांतता, आरोग्य आणि दापोलीच्या सकारात्मक ओळखीचा संदेश देणाऱ्या या स्पर्धेला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटातील तब्बल २४७ धावपटूंनी सहभाग नोंदवला.

५ किलोमीटर मॅरेथॉनमध्ये एकूण १४६ स्पर्धक सहभागी झाले होते, ज्यामध्ये १२४ पुरुष आणि २२ महिलांचा समावेश होता.

५ किलोमीटर पुरुष गटात स्वराज जोशी याने प्रथम, यश शिर्के याने द्वितीय, तर अथर्व चव्हाण याने तृतीय क्रमांक पटकावला.

महिला गटात सई चव्हाण हिने प्रथम, दीक्षा कडू हिने द्वितीय, तर पूजा राजभर हिने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच, २ किलोमीटर फन रनमध्ये १०१ स्पर्धकांनी सहभाग घेतला, ज्यात ७८ पुरुष आणि २३ महिला धावपटूंचा समावेश होता.

या गटात पुरुष वर्गात पवन गौड याने प्रथम, सुनील रेवाळे याने द्वितीय, तर राज राजेशिर्के याने तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटात वैदेही गुरव हिने प्रथम, सोनाली भागणे हिने द्वितीय, तर जानवी कांबळे हिने तृतीय क्रमांक मिळवला.

विजेत्यांना आकर्षक चषक, पदके, प्रमाणपत्रे आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ५ किलोमीटर मॅरेथॉनमध्ये प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे ३,०००, २,००० आणि १,००० रुपये, तर २ किलोमीटर फन रनमधील विजेत्यांना अनुक्रमे १,०००, ७५० आणि ५०० रुपये रोख पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेच्या प्रारंभप्रसंगी ध्वज दाखवून स्पर्धेचे उद्घाटन दापोलीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, नगरसेविका साधना बोत्रे, मुख्य प्रायोजक पितांबरी प्रॉडक्ट्सचे पराग साळवी, अरुण गांधी आणि जेसीआय दापोलीचे अध्यक्ष कुणाल मेहता यांच्या उपस्थितीत झाले.

या मॅरेथॉनचे विशेष आकर्षण म्हणजे साठ वर्षांवरील नऊ ज्येष्ठ नागरिकांनी आणि दहा वर्षांखालील चौदा लहान मुलांनीही यात धाव घेतली. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जिद्दीसाठी विशेष पदके प्रदान करण्यात आली.

या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक म्हणून पितांबरी प्रॉडक्ट्सने सहकार्य केले. यशस्वी आयोजनासाठी दापोली पोलीस, आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणारे सुरज शिगवण तसेच प्रांत कार्यालयाकडून विशेष सहकार्य लाभले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष कुणाल मेहता, सचिव रोशन वेदक, प्रकल्प अध्यक्ष मयुरेश शेठ, प्रकल्प संचालक फैझान पुरकर, प्रकल्प समन्वयक पार्थ साबळे, तेजस मेहता, ऋषिकेश शेठ, निहाल शिरगावकर आणि जेसीआय दापोलीच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल मंडलिक याने केले. ‘रन फॉर पीस, रन फॉर दापोली’ या घोषवाक्याच्या माध्यमातून दापोलीमध्ये आरोग्यदायी जीवनशैली आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.