रत्नागिरी : उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईंनकर यांची पालघर येथे बदली झाल्याने रिक्त झालेल्या पदाचा कार्यभार भारतीय पोलीस सेवा अधिकारी आरंशा यादव यांनी अधिकृतपणे स्वीकारला आहे.
निलेश माईंनकर यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासकीय कामकाज आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात यशस्वी कामगिरी बजावली होती.
त्यांच्या बदलीनंतर या पदाची धुरा आता २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी आरंशा यादव सांभाळणार आहेत. मूळच्या हरियाणाच्या असलेल्या आरंशा यादव यांनी २०२२ च्या युपीएससी नागरी सेवा परीक्षेत देशात २०१ वी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले होते.
त्यांनी दिल्लीच्या प्रतिष्ठित स्टीफन्स कॉलेजमधून इंग्रजी ऑनर्सची पदवी घेतली असून, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
सुरुवातीला त्यांची निवड गुजरात केडरसाठी झाली होती, मात्र विवाहानंतर त्यांना महाराष्ट्र केडर देण्यात आले. रत्नागिरीत रुजू होण्यापूर्वी त्या कोल्हापूर येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या.
आरंशा यादव यांनी पदभार स्वीकारल्यामुळे रत्नागिरी उपविभागातील पोलीस प्रशासकीय कामे, कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारी नियंत्रणाला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वेळेत सोडवणे, महिला व बालकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि पोलीस दलात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने एका उच्चशिक्षित अधिकाऱ्याची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
या बदलामुळे स्थानिक पातळीवरील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न प्रभावीपणे हाताळले जातील, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

