Ratnagiri : आम्ही सिद्ध लेखिका अखिल भारतीय साहित्य संस्था, कोकण विभाग, रत्नागिरी यांच्या वतीने स्थानिक कवी-कवयित्रींसाठी आयोजित करण्यात आलेला ‘रिमझिम रिमझिम’ हा काव्यमय कार्यक्रम रत्नागिरीत नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
रत्नागिरीतील अ. के. देसाई हायस्कूलच्या रंगमंचावर रंगलेल्या या कार्यक्रमाला कवींसह श्रोत्यांचीही उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. पावसाळा, निसर्ग, श्रावण आणि विविध भावविश्व उलगडणाऱ्या कवितांच्या सादरीकरणाने हा कार्यक्रम बहारदार झाला.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संस्थेच्या कोकण प्रमुख सुनेत्रा जोशी, कार्यकारिणी सदस्य ऋतुजा कुलकर्णी आणि ज्येष्ठ सदस्य कुंदा बापट उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमा जोशी यांनी केले असून त्यांनी या काव्यमैफिलीच्या आयोजनामागची भूमिका आणि संस्थेच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनेत्रा जोशी होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला तसेच राज्य कार्यकारिणीत प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या ऋतुजा कुलकर्णी यांचे कौतुक केले.
नवोदित कवींनी झटपट प्रसिद्धीच्या मागे न लागता सातत्याने सराव करून लिहिण्याची आणि सादरीकरणाची कला आत्मसात करावी, असा मोलाचा सल्ला सुनेत्रा जोशी यांनी दिला.
आम्ही सिद्ध लेखिका ही प्रामुख्याने महिलांसाठी असलेली साहित्य संस्था असली तरी, या संस्थेने पहिल्यांदाच स्त्री-पुरुष कवींचा एकत्रित कार्यक्रम आयोजित करून एक नवा पायंडा पाडला.
या मैफिलीत वैजयंती पाटील, शमा प्रभुदेसाई, दीप्ती झगडे, प्रियांका रांजे, शर्विल रांबाडे, अनुष्का नागवेकर, श्रावणी शिंदे, कुंदा बापट, चित्रा गोस्वामी, वसुंधरा जाधव, रोहित नाटेकर, मानसी चव्हाण, प्रभात कोकझे, स्नेहल शेवडे, गौरी थत्ते, उमा जोशी, विस्मया कुलकर्णी, तन्वी पटवर्धन, अनुराधा आपटे, सुनेत्रा जोशी आणि ऋतुजा कुलकर्णी अशा एकूण २० कवी-कवयित्रींनी सहभाग घेत आपल्या वैविध्यपूर्ण कविता सादर केल्या. या सुरेख कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा आपटे यांनी केले.
प्रत्येक कवी-कवयित्रीने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत कविता सादर करत रसिकांची मने जिंकली, ज्याला उपस्थित श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. उत्कृष्ट कविता आणि उत्तम सादरीकरण करणाऱ्या कवींना यावेळी पुस्तक देऊन गौरविण्यात आले, तर उपस्थित सर्वच कवींचे पेन देऊन कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमात सादर झालेल्या सर्व कवितांचे लवकरच ई-बुक तयार करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली, ज्यामुळे साहित्यिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अ. के. देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आणि संस्थेच्या सदस्या अंजली पिलणकर यांनी सभागृह आणि इतर व्यवस्था उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ऋतुजा कुलकर्णी यांनी उपस्थित कवी, श्रोते, सूत्रसंचालिका अनुराधा आपटे आणि शाळेचे कर्मचारी परब यांचे आभार मानले. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या या उपक्रमामुळे रत्नागिरीतील साहित्यप्रेमींना एकत्र येण्याची सुवर्णसंधी मिळाली असून, सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

