दापोली : एज्युकेशन सोसायटी संचालित हर्णै-पाजपंढरी येथील श्रीराम हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनाली मेहेंदळे उपस्थित होत्या, तर प्रमुख वक्ते म्हणून मिलिंद जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक अर्जुन घुले, ज्येष्ठ शिक्षिका मीनाक्षी नागदिवे, दिगंबर पावसे आणि ओंकार बेडेकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अर्जुन घुले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना बोधकथा सांगत गुरु आणि शिष्य यांच्यातील नात्याचे महत्त्व समजावून सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मिलिंद जोशी यांनी अनादी काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या गुरु-शिष्य परंपरेची उदाहरणे देत विद्यार्थ्यांच्या आयुष्यात गुरुचे स्थान किती महत्त्वाचे असते, हे विविध दाखले देत पटवून दिले.

अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर पावसे यांनी केले, तर ओंकार बेडेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.