पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून शिक्षकांचा गौरव, ‘जगात आदर्श’ असे संबोधन

रत्नागिरी  : ‘माझ्या देशातले शिक्षक देशात नाही; तर जगात आदर्श आहेत,’ असे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा रत्नागिरीच्या जिल्हास्तरीय अधिवेशनात काढले.

रविवारी झालेल्या या कार्यक्रमात सामंत यांनी प्राथमिक शिक्षकांच्या योगदानाची प्रशंसा करताना म्हटले की, ‘प्राथमिक शिक्षक देशाच्या शिक्षणाचा पाया रचतात. त्यांनी मला मराठी शिकवले नसते, तर आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला नसता.’

सामंत यांनी शिक्षक संघटनेच्या दोन मागण्यांची तात्काळ पूर्तता करत ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ अशी कार्यशैली दाखवली.

त्यांनी जाहीर केले की, राज्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात येईल आणि अतिउत्कृष्ट गोपनीय अहवाल मिळालेल्या शिक्षकांना प्रलंबित वेतनवाढ तात्काळ देण्यात येईल.

शिक्षकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगताना त्यांनी शिक्षक संघटनांना एकाच उद्दिष्टासाठी भरीव काम करण्याचे आवाहन केले.

‘उदंड संघटना तयार झाल्याने शिक्षकांची अडचण होते. शिक्षकांचे हित जोपासले पाहिजे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

प्राथमिक शिक्षक विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवतात आणि पालकांपेक्षा त्यांची जबाबदारी श्रेष्ठ आहे, असे सामंत म्हणाले. CBSE मुळे आपली मुले इंग्रजी माध्यमातील मुलांपेक्षा गुणवत्तेत पुढे जातील, त्यामुळे पालकांचा खाजगी शाळांकडे असलेला कल कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हिंदीच्या सक्तीवरही त्यांनी भाष्य करताना मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. ‘देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची मूल्ये प्राथमिक शाळेतूनच रुजवली जातात. शिक्षकांच्या चांगल्या कामासाठी पालकमंत्री म्हणून मी सदैव तुमच्यासोबत आहे,’ अशी ग्वाही त्यांनी दिली.

संघटनेचे राज्याध्यक्ष देविदास बसवदे यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करण्याचे भाग्य असल्याचे सांगितले. अशैक्षणिक कामांमुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याने येत्या जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात एकसमान उपक्रम राबवण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक घेण्याचे नियोजन आहे.

शिक्षण सेवक पद रद्द करणे आणि जुन्या पेन्शन योजनेची मागणी पूर्ण करण्यासाठी संघटना कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. ‘१९१० मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचा इतिहास चळवळीचा आहे,’ असे बसवदे यांनी सांगितले.

अधिवेशनात नवी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. दिलीप देवळेकर (जिल्हाध्यक्ष), भालचंद्र घुले (जिल्हा सरचिटणीस), शांताराम पवार आणि सुखदेव पवार (जिल्हा कार्याध्यक्ष), रमाकांत शिगवण (शिक्षक नेते), क्षमा गावकर (महिला आघाडीप्रमुख) यांची निवड झाली.

राज्यमंत्री योगेश कदम यांचा शुभेच्छा संदेश वाचनात आला. प्रास्ताविक दिलीप देवळेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रवीण सावंत आणि वैभव बोरकर यांनी केले. आभार प्रदर्शन संतोष देवघरकर यांनी केले.

यावेळी जिल्ह्यातील अनेक शिक्षक उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त शाळा आणि शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*