स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी… भाग – 4

जगात खतरनाक, धोकादायक म्हणून ओळखले जाणारे ‘नेपाल नागरिक उड्डयन प्राधिकरण तेनसिंग हिलरी विमानतळ नागरिक उड्डयन कार्यालय’ लुकला विमानतळाचा फलक समोर दिसत होता.

या विमानतळासभोवती आणि त्याला अगदी खेटून सर्व हाॕटेल्स उभी आहेत. इथे येणारा प्रत्येक गिर्यारोहक या हाॕटेलवर नाश्ता करुनच पुढील साहसी पर्यटनाला पावले टाकतो.

आमच्या सर्वांचा देखील शरीराला गरम ठेवणारा आणि मन प्रफुल्लीत करणारा नाश्ता आता झालेला होता.

समोर छोटे लुकला विमानतळ दिसत होते. एव्हरेस्ट सर करणारे सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचे सोनेरी रंगातील उभे पुतळे त्यांच्या कामगिरीची आणि या विमानतळ निर्मितीची आठवण करुन देत होते.

जगातील सर्वात धोकादायक, खतरनाक म्हणून ‘लुकला’ विमानतळाविषयी जाणून घेण्याचे स्वारस्य होते. आज ते उलगडायचं होतं. त्याविषयी मुद्दामच जाणून घेतलं.

नेपाळचे सर्वात मोठे अर्थकारण हे ‘गिर्यारोहण’ भोवती फिरते. जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट, मृत्यूचा पर्वत अशी ओळख असणारा अन्नपुर्णा, नोप्से, लोत्से, अमादाबलम, लोबुचे, गोक्यो, थ्री पासेस, विविध बेस कँप या सर्वांचा या साहसी भ्रमंतीत समावेश होतो. जगभरातील गिर्यारोहक हे गिर्यारोहणासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात.

नेपाळमधील हे २४ व्या क्रमांकाचे विमानतळ आहे. १७ / १९ सिटर छोटी विमाने तसेच हेलिकाॕप्टर्स येथे उतरतात आणि उडाण घेतात.
नेपाळ सरकार आणि खुम्बु पासांग ल्हामू नगरपालिकेने याविषयी अधिकृत माहिती प्रदर्शित केली आहे.

१९६४ मध्ये सर एडमंड हिलेरी, जिम विल्सन, पीटर मुलग्रेव्ह आणि हिमालयन ट्रस्टच्या इतर सदस्यांनी खुम्बू भागाला भेट दिली होती. त्या वेळी हिलेरी यांना ‘चौरीखार्का’च्या वरची एक सपाट जमीन दिसली.

त्यांनी जिम विल्सन यांना तिथे विमानतळ तयार करता येईल का, याची तपासणी करायला सांगितले. जिम विल्सन यांनी अहवाल दिला की, ही जागा एअर फील्डसाठी चांगली आहे. पण, ती सुपीक जमीन असल्याने स्थानिक लोक ती विकण्यास कदाचित तयार होणार नाहीत.

पण, नंतर लुकला येथील काही शेतकरी स्वतःहून जिम विल्सन यांच्याकडे आले आणि त्यांनी विमानतळासाठी आपली जमीन विकण्याची तयारी दर्शवली.

त्यांनी तर असा दावाही केला की, “येथे वारा नेहमी योग्य दिशेनेच वाहतो!” यावर सर एडमंड हिलेरी यांनी गंमतीने म्हटले की, “विमानतळाबद्दल काहीही माहिती नसलेल्या डोंगराळ भागातील लोकांना वाऱ्याच्या दिशेचा असा अचूक अंदाज कसा आला, हे मला अद्याप माहीत नाही!”

ती जमीन तीन भागांत विभागलेली होती. एक तृतीयांश भाग खडकाळ कुरण होता, एक तृतीयांश भाग झाडा-झुडपांचा होता आणि उर्वरित एक तृतीयांश भागात बटाट्याची शेती केली जात होती.

ती जमीन अजिबात सपाट नव्हती. खालून वरपर्यंत त्यात जास्त चढ होता. पण, ‘स्टोल’ (STOL – Short Takeoff and Landing) विमानांसाठी ही अडचण नव्हती.

या जमिनीचे मालक आयला (Aila), चोक्की (Chokki), पासांग (Pasang), वांग्याल (Wangyal) आणि इला तेनझिंग (Ila Tenzing) हे होते. जमीन खरेदीची बोलणी खूप सोपी झाली.

सर एडमंड हिलेरी यांनी नेपाळ सरकारच्यावतीने एकूण ६३५ अमेरिकन डॉलर्स (US $ 635) मध्ये ही जमीन खरेदी केली. त्या काळात या भागात ही खूप मोठी रक्कम मानली जात असे.

विमानतळाची निर्मिती आणि ‘शेरपा डान्स’ची अनोखी युक्ती
सिरदार मिंग्मा त्सेरिंग यांनी काम करण्यासाठी १६० पेक्षा जास्त शेरपांना एकत्र केले.

मिंग्मा त्सेरिंग यांचे सहाय्यक म्हणून ‘अनुलू’ काम पाहत होते आणि डॉन मॅके या कामावर देखरेख करत होते. जमीन समतल करण्यासाठी त्यांनी काही वर्षांपूर्वी ‘मिंग्बो’ येथे वापरलेली पद्धत वापरली.

पहिले ‘पिलाटस’ (Pilatus) विमान लवकरच उतरणार होते. परंतु, धावपट्टीची माती अजूनही हवी तशी घट्ट आणि सपाट झाली नव्हती. यासाठी एक अनोखी युक्ती करण्यात आली.

मोठ्या प्रमाणात ‘चांग’ (स्थानिक मद्य) खरेदी करण्यात आले आणि ५० शेरपांचा गट एकमेकांच्या हातांत हात घालून धावपट्टीवर मागे-पुढे नाचू लागला. शेरपांचे हे नृत्य अतिशय जोमदार असते, ज्यामध्ये पायाने जमिनीवर जोरात थपका दिला जातो.

तिथे अगदी उत्सवासारखे वातावरण तयार झाले आणि त्यांच्या जोमदार नृत्यामुळे धावपट्टीची माती चांगली दाबून घट्ट झाली. दोन दिवस सलग नाचल्यामुळे विमानतळाला एक मजबूत आणि गुळगुळीत पृष्ठभाग मिळाला.

सुरुवातीला ही धावपट्टी ११५० फूट लांब आणि १०० फूट रुंद होती. तिच्या कडा पांढऱ्या रंगाच्या बोर्डने ठळकपणे दर्शवल्या होत्या. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सर एडमंड हिलेरी यांनी एकूण २००० डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केला.

पहिले यशस्वी लँडिंग
नागरी विमान वाहतुकीचे दोन प्रतिनिधी या पहिल्या विमानाचे निरीक्षण करण्यासाठी आले होते आणि त्यांचा निर्णय अंतिम असणार होता.

२६ ऑक्टोबर १९६४ रोजी या विमानतळावर पहिले विमान यशस्वीपणे उतरले. पहिले ‘पिलाटस’ विमान लुकलावर घिरट्या घालून सुरक्षितपणे जमिनीवर उतरले, तेव्हा तिथे वाट पाहणाऱ्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद आणि समाधान होते.

हा संपूर्ण विमानतळ तयार होण्यासाठी एक महिना लागला. सुरुवातीला ११५० फूट लांब असलेल्या या धावपट्टीची लांबी नंतर १४०० फूट करण्यात आली आणि पृष्ठभागावर टिकाऊ गवत लावले गेले.

या धावपट्टीच्या एका बाजूला खोल दरी आहे. तर, दुसऱ्या बाजूला डोंगराची नैसर्गिक भिंत आहे. इथे विमान यशस्वीपणे उतरवणे, हे वैमानिकाचे कसब आहे. त्यासाठीच कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि अनुभवी वैमानिक हवा. कारण, १९६९ मध्ये कोसळलेले डकोटा विमान होय.

“द क्रॅश्ड डकोटा १९६९” हे प्रदर्शित छायाचित्र या धोकादायक विमानतळाविषयी खूप काही सांगून जाते.

असो.. जगातील या धोकादायक विमानतळावर यशस्वीपणे उतरण्याचा अनुभव आम्हा सर्वांना आज घेता आला. अर्थात… ते कसब मात्र कुशल वैमानिकाचेच होते… त्याला साथ होती निसर्गाच्या स्वच्छ हवामानाची…

– कुसुमानंद (प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते)
9403464101