भोपाळ : ‘लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में…’ यांसारख्या काळजाला भिडणाऱ्या ओळींमधून सामान्यांच्या आणि विस्थापितांच्या वेदना मांडणारे प्रसिद्ध उर्दू शायर बशीर बद्र यांचे गुरुवारी (२८ मे) भोपाळमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास निधन झाले.
बशीर बद्र दीर्घकाळापासून डिमेंशिया या आजाराने ग्रस्त होते. त्यांचा मुलगा तय्यब बद्र याने या वृत्ताला दुजोरा दिला असून, त्यांच्या निधनाने उर्दू साहित्याच्या दुनियेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी भोपाळच्या बडा बाग कब्रस्तानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
१५ फेब्रुवारी १९३५ रोजी अयोध्येत जन्मलेल्या बशीर बद्र यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि नंतर तिथेच अध्यापनाचे कार्यही केले.
त्यांच्या शायरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी उर्दू गझलला सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत आणले. जड शब्दांऐवजी त्यांनी सोप्या भाषेतून थेट संवाद साधला.
त्यामुळेच त्यांचे शेर केवळ मुशायऱ्यांपुरते किंवा पुस्तकांपुरते मर्यादित न राहता संसदेतील वादविवाद, राजकीय भाषणे, आंदोलने आणि अगदी प्रेमपत्रांमध्येही सहज वापरले गेले.
‘उजाले अपनी यादों के’, ‘आस’ यांसारख्या कलाकृतींनी त्यांना अफाट लोकप्रियता मिळवून दिली. १९९९ मध्ये त्यांना ‘आस’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
बशीर बद्र यांची शायरी जितकी मवाळ होती, तितके त्यांचे वैयक्तिक आयुष्य सोपे नव्हते. मीरतच्या दंगलीत त्यांचे घर जाळण्यात आले होते.
या आगीत त्यांच्या अनेक नव्या गझला आणि वैयक्तिक डायरी जळून खाक झाली होती. या घटनेनंतर बशीर बद्र तीव्र नैराश्यात गेले होते.
चित्रपट निर्माता विशाल भारद्वाज याने एका मुलाखतीत या आठवणीला उजाळा दिला होता. त्यावेळी १९ वर्षांचा असलेला विशाल आणि ७० वर्षांचे भंडारी नावाचे गृहस्थ यांनी मिळून बशीर बद्र यांच्या जळालेल्या गझला आठवून त्यांना पुन्हा लिहिण्यास मदत केली होती.
या दोघांनी मिळून जवळपास ९० टक्के हरवलेल्या कविता पुन्हा मिळवून दिल्या, ज्यामुळे १५ दिवसांत बशीर बद्र नैराश्यातून बाहेर येऊ शकले आणि त्यांनी पुन्हा लिहायला सुरुवात केली.
ही केवळ एका शायरची वैयक्तिक शोकांतिका नव्हती, तर त्या काळातील हिंसेचा तो एक जिवंत दस्तऐवज होता. त्यामुळेच त्यांच्या शायरीमध्ये घर, वस्ती, आठवणी आणि विस्थापन हे विषय वारंवार डोकावतात.
शाहीन बाग आंदोलनापासून ते संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी एकमेकांवर टीका करतानाही बशीर बद्र यांच्याच शेरांचा आधार घेतला होता.
‘दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हों’ अशा त्यांच्या ओळी कोणत्याही एका विचारधारेच्या किंवा वर्गाच्या न राहता त्या सार्वजनिक जीवनाची सामायिक भाषा बनल्या होत्या.
बशीर बद्र आज हयात नसले तरी, घर तुटण्याचे दुःख असो वा बिघडलेली नाती, त्यांचे शब्द कायम लोकांच्या ओठांवर जिवंत राहतील.

