रत्नागिरी: मुंबई रेल्वे आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही वर्षांत रेल्वे रूळ ओलांडताना तसेच धावत्या गाडीत चढण्याच्या किंवा उतरण्याच्या घाईत अनेक प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या किंवा त्यांना कायमचे अपंगत्व आल्याच्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून ‘जीवन रक्षा अभियान’ हाती घेण्यात आले आहे.
याच उपक्रमाचा भाग म्हणून १७ जून रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर हे अभियान राबवण्यात आले. प्रवाशांमध्ये सुरक्षेबाबत जनजागृती करणे आणि संभाव्य अपघात टाळणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

आपल्या नियोजित रत्नागिरी दौऱ्यावर असलेले भाजप नेते रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या या अभियानाला आवर्जून भेट दिली.
प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आणि मोहिमेला आपल्या सदिच्छा दिल्या.
या जनजागृतीपर कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी, पोलीस उपनिरीक्षक रविकुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी धापसे, संगीता लोंढे, रत्नागिरी रेल्वे स्थानक अधीक्षक भूपेंद्र कोवे, वाणिज्य अधिकारी शुभदा देसाई, आरपीएफ निरीक्षक सतीश विधाते यांच्यासह रेल्वे पोलीस दलातील अंमलदार आणि होमगार्डचे जवान उपस्थित होते.


