दापोली : शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूल विद्याभारतीच्या इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एक आगळावेगळा उपक्रम नुकताच राबवला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्तकलेतून प्लास्टिक आणि रासायनिक साहित्याला फाटा देत आकर्षक व पर्यावरणपूरक नागमूर्ती तसेच राख्यांची निर्मिती करून त्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, उद्योजकता, हस्तकौशल्य आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या कलाकृतींना स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सर्वांनी या पर्यावरणपूरक दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले आहे.
या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शिक्षक अभिषेक बुरटे, अक्षय मांडवकर, अमित गुरव, मयुरेश बने, शैलेश मिसाळ आणि प्रिया पास्ते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक शरद कांबळे आणि उपमुख्याध्यापक मगदूम एस. आय. यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
या उपक्रमाला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रसाद करमरकर, सेक्रेटरी विनोद जोशी, शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर आणि संचालिका स्मिता सुर्वे यांनी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, जालगावचे सरपंच अक्षय फाटक यांनी या उपक्रमाला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकवृंदाचे अभिनंदन केले. यावेळी उपस्थित पालक आणि नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या या कल्पक व पर्यावरणपूरक उपक्रमाचे भरभरून कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.

