चिपळूण: देशभरातील तरुणांना संघटित करून आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आमच्या पक्षात प्रवेश करावा, अशी खुली ऑफर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
चिपळूण दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जंतर-मंतरवर झालेले आंदोलन शांततापूर्ण मार्गाने व्हायला हवे होते, मात्र तसे घडले नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
दीपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या युवक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील मागण्या मान्य झाल्या असून, आता ते शाळा सुधारण्यासाठी आंदोलन करत आहेत आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षात यावे, असे आठवले म्हणाले. दीपके यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतरही त्यांना आपली आंदोलने सुरू ठेवण्यास परवानगी देणार का, या प्रश्नावर बोलताना आठवले यांनी अटी आणि शर्तींवर त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल असे स्पष्ट केले.
याचबरोबर, सध्या नोकऱ्या मिळत नसल्याने दलित समाजातील तरुणांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कोकणचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून होणे गरजेचे असून, येथील तरुणांना नोकरी आणि व्यवसायानिमित्त मुंबईला जावे लागू नये यासाठी कोकणातच उद्योगधंदे वाढीस लागण्याची मोठी आवश्यकता असल्याचेही आठवले यांनी यावेळी नमूद केले.

