दापोली: तालुक्यातील करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये १६ ऑगस्ट रोजी स्ट्रेस मॅनेजमेंट (तणाव व्यवस्थापन) या विषयावर शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या निमित्ताने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) पुणे विभागाचे रिजन ऑफिसर राधाकृष्ण बलानी यांनी शाळेला भेट दिली.

या कार्यशाळेत सीबीएसईचे तज्ज्ञ मार्गदर्शक सुजय मेहता आणि प्रदीप पाणीग्रही यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. या विशेष कार्यशाळेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या सिटी कोऑर्डिनेटर आणि माने इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सुमन अरोरा, रत्नागिरी येथील सर्वंकष विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मोनिका जयस्वाल, कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सिल्विया, चिपळूण येथील यश अकॅडमीच्या मुख्याध्यापिका समिधा चव्हाण, खेड येथील समर्थ कृपा स्कूलचे मुख्याध्यापक सय्यद अली आणि दापोली येथील रामराजे इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक शेखर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध सीबीएसई शाळांमधील एकूण ३७ शिक्षकांनी सहभाग नोंदवला. ग्रामीण भागातील शाळांना भेटी देण्यास आणि तेथील शैक्षणिक विकासाला चालना देण्यास प्राधान्य देणाऱ्या रिजन ऑफिसर राधाकृष्ण बलानी यांनी यावेळी ग्रामीण भागातील शिक्षकांच्या सक्षमीकरणावर भर दिला, तसेच शिक्षकांनी आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.

यावेळी संस्थाध्यक्ष सुजय मेहता यांनी शिक्षकांसाठी शाळांमध्ये तणावमुक्त शिक्षक कक्ष कसा असावा, याबाबत सेंट्रल बोर्डाकडून सविस्तर मार्गदर्शन मिळावे, अशी विनंती रिजन ऑफिसर यांच्याकडे केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका रितू मेहता यांनी केले.

ही कार्यशाळा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाल्याची भावना सहभागी शिक्षकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.