दापोली : तालुक्यातील कोळथरे येथील कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य, शिक्षण, उद्योजकता आणि समाज प्रबोधन या क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य केले जात आहे.

याच सामाजिक बांधिलकीतून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर मदत मिळावी या उद्देशाने प्रतिष्ठानतर्फे नुकतेच दापोलीतील बुरोंडी आणि मळे या दोन गावांमध्ये रुग्णोपयोगी साहित्य केंद्रांचे एकाच दिवशी उद्घाटन करण्यात आले.

दाभोळ परिसरातील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. मधुकर भिकाजी लुकतुके यांचे नातू आदित्य पंडित यांच्या हस्ते या दोन्ही सुविधांचे लोकार्पण पार पडले.

या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दाभोळ जिल्हा परिषद गटाच्या सदस्या साधना महाजन आणि उद्योजक मिहीर महाजन यांचा अत्यंत मोलाचा वाटा राहिला असून, ओमकार कात्रे, कौस्तुभ वैद्य आणि अविनाश काष्टे या कार्यकर्त्यांनी अवघ्या तीन महिन्यांत ग्रामीण भागात ही कायमस्वरूपी आरोग्य सेवा उभी राहिल्याबद्दल विशेष समाधान व्यक्त केले आहे.

या केंद्रामधून ग्रामीण रुग्णांना फाऊलर बेड, वॉकर, कमोड चेअर, स्टिक्स, व्हील चेअर, एअर बेड आणि ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यांसारखे महागडे आणि अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य आता गावातच सहज उपलब्ध होणार आहे.

डॉ. मधुकर लुकतुके यांच्या स्मरणार्थ तीन महिन्यांपूर्वी दाभोळ गावात प्रतिष्ठानचे पहिले केंद्र सुरू करण्यात आले होते. या पहिल्या केंद्राचा रुग्णांना होत असलेला मोठा फायदा लक्षात घेऊन गेल्या आठवड्यात पंचनदी-कोळथरे येथे दुसरे केंद्र सुरू करण्यात आले, आणि आता बुरोंडी व मळे येथे या सुविधेचा विस्तार करण्यात आला आहे.

या केंद्रांतील साहित्याच्या वापराचे आणि देखभालीचे संपूर्ण नियोजन संबंधित गावातील ग्रामस्थांची व्यवस्था समिती करणार आहे. यामुळे संपूर्ण दाभोळ जिल्हा परिषद गटातील आरोग्य यंत्रणेला आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या नव्या सुविधेसाठी सहाय्य करणाऱ्या डॉ. लुकतुके यांच्या नातेवाईकांचे व हितचिंतकांचे प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्याला खेडचे माजी नगराध्यक्ष व कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिन पाटणे, उपाध्यक्ष मिहीर महाजन, पुण्याचे उद्योजक शंतनू गुर्जर, अमेय लॅबोरेटरीचे आणि पॅथॉलॉजी संघटनेचे अध्यक्ष बिपिन मयेकर, प्रदीप राणे, दिनेश आडविलकर, संतोष आंबेकर, दीपक घडशी, कौशल केळसकर, महेंद्र राणे, डॉ. दळवी, सुनील फिलसे, प्रकाश सावरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.