दापोली : आयुष्याच्या प्रदीर्घ प्रवासात काळ वेगाने पुढे सरकतो, पदांच्या जबाबदाऱ्या बदलतात आणि यशाची सर्वोच्च शिखरेही गाठली जातात; मात्र ज्या भूमीतून या प्रवासाची पहिली सुरुवात होते, ती माती माणसाला कायम साद घालत असते.

राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या दापोली भेटीत याच हळव्या आणि नॉस्टॅल्जिक भावनेचा प्रत्यय आला.

तब्बल तीन दशकांपूर्वी, १९९१-९२ च्या काळात ज्या दापोलीतून उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेचे पहिले धडे गिरवले, त्याच भूमीत राज्याच्या प्रशासकीय प्रमुखाच्या भूमिकेतून परतताना त्यांच्या जुन्या आठवणींना उधाण आले होते.

दापोलीचा हा दौरा केवळ एका वरिष्ठ अधिकाऱ्याची अधिकृत शासकीय भेट नव्हता, तर एका व्यक्तीने आपल्या भूतकाळातील सोनेरी क्षणांच्या घेतलेल्या शोधाचा आणि कृतज्ञतेचा प्रवास होता.

या दौऱ्यात अग्रवाल यांनी सुवर्णदुर्ग किल्ला, हर्णे येथील बांधकाम सुरू असलेली जेटी आणि गिम्हवणे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला भेट दिली.

परंतु, या संपूर्ण प्रवासातील सर्वात भावनिक टप्पा ठरला तो त्यांच्या जुन्या निवासाची आणि कार्यालयाची भेट.

तरुण वयात ज्या वास्तूमध्ये राहून त्यांनी प्रशासकीय कामाची सुरुवात केली, त्या ‘कॅप्टन हाऊस’च्या भिंतींना पुन्हा पाहताना जुन्या आठवणींचा चित्रपट त्यांच्या डोळ्यांसमोरून तरळून गेला.

एखाद्या वास्तूशी जोडलेले तरुणपणाचे दिवस कसे मनात घर करून असतात, हे त्यांच्या देहबोलीतून जाणवत होते. यानंतर जेव्हा त्यांनी प्रांत कार्यालयात पाऊल ठेवले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या विजयकुमार सूर्यवंशी यांनी चक्क अग्रवाल यांनी तीन दशकांपूर्वी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली आणि कार्यालयाने आजही अत्यंत काळजीपूर्वक जपून ठेवलेली जुनी निकालपत्रे त्यांच्यासमोर ठेवली.

कित्येक वर्षांपूर्वीचे स्वतःचे ते जुने हस्ताक्षर पाहून अग्रवाल हरखून गेले आणि सुखावले.

त्यांनी त्या काळातील कामाचे अनुभव आणि अनेक जुने किस्से उपस्थितांसोबत अगदी मनमोकळेपणाने वाटून घेतले. जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे आणि गट विकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्या उपस्थितीत पार पडलेला हा दौरा, एका अधिकाऱ्याने आपल्या कर्मभूमीविषयी आणि सुरुवातीच्या संघर्षाच्या दिवसांविषयी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचा एक अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी अध्याय ठरला.