दापोली : शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला संभाव्य विजेचा धोका टाळण्यासाठी शिवसेना कार्यकर्ता स्वरूप नंदकुमार महाजन यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून महावितरणकडून बाजारपेठ परिसरातील धोकादायक विद्युत तारांखालील झाडांच्या फांद्या छाटण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
दापोली शहरातील बाजारपेठ परिसरातून दरवर्षी गणेश आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या उत्साहात निघतात व यात हजारो नागरिक सहभागी होतात. काही ठिकाणी विद्युत खांबांवरील सर्व्हिस लाईन तसेच विद्युत वाहिन्या झाडांच्या फांद्यांमध्ये अडकल्यामुळे मोठ्या उंचीची वाहने, रथ, देखावे आणि गणेशमूर्तींच्या मिरवणुकीदरम्यान अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
या गंभीर समस्येची दखल घेत स्वरूप नंदकुमार महाजन यांनी महावितरणच्या दापोली उपविभागाकडे लेखी निवेदन देऊन अनावश्यक आणि धोकादायक सर्व्हिस लाईन काढणे, वाकलेल्या सर्व्हिस लाईन योग्य उंचीवर सुरक्षित करणे, कमी उंचीवरील विद्युत वाहिन्यांची उंची वाढविणे तसेच गणेशोत्सव मार्गावरील तारा व झाडांची तपासणी करून दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.
या निवेदनाची गंभीर दखल घेत महावितरणने ताबडतोब कार्यवाही करत विद्युत तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे मोठा अनर्थ टळण्यास मदत होणार असून नागरिकांकडून या वेळेवर केलेल्या कारवाईचे स्वागत होत आहे.

