दापोली : तालुक्यामध्ये ४ जुलै ते १० जुलै या कालावधीत पोक्सो अंतर्गत चार गुन्हे दाखल झाल्याने महिला, महाविद्यालयीन युवती आणि शालेय विद्यार्थिनींच्या मनामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर निवेदिता प्रतिष्ठानच्या पुढाकाराने एन.के. वराडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १३ जुलै रोजी दापोली पोलीस स्थानक आणि दापोली एसटी आगार प्रमुख यांना निवेदन दिले.

या निवेदनाद्वारे आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आणि विकृत मनोवृत्तीच्या वाहकाला तातडीने बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सर्व आरोपींना भर चौकात पोलिसांनी चाबकाचे फटके मारावेत, अशी आग्रही मागणी केली.

या निवेदनामध्ये केवळ चालू घडामोडींचाच नव्हे, तर मागील घटनांचाही उल्लेख करण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात हर्णे येथे एका ७२ वर्षीय वृद्धाने एका २५ वर्षीय दिव्यांग पीडित महिलेवर बलात्कार केला होता, त्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणीही दापोली पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या बलात्कार आणि छेडछाडीच्या घटनांमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण असून, आम्हाला योग्य संरक्षण द्यावे अशी कळकळीची विनंती महाविद्यालयीन युवतींनी प्रशासनाला केली आहे.

या आंदोलनादरम्यान निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे, समन्वयक स्कंधा खेडेकर, प्राजक्ता शिगवण, दापोली तालुका व्यापारी संघटनेचे सचिव मिलिंद शेठ, योगेश साटम, मुग्धा सरदेसाई, संबंधित महिला प्रतिनिधी, नागरिक आणि मोठ्या संख्येने एन. के. वराडकर व बेलोसे महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.