दापोली: दापोली परिसरातील सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक आणि व्यावसायिक प्रचंड त्रस्त झाले असून, महावितरणच्या हलगर्जी कारभाराविरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दापोली कोंड येथील महावितरण कार्यालयावर येत्या गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता धडक देऊन जाब विचारण्याचे आवाहन मंगेश मोरे आणि स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी केले आहे.
गेल्या महिनाभरापासून दिवसातून अनेक वेळा वीज जाणे, व्होल्टेज कमी-जास्त होणे यामुळे पर्यटन आणि छोट्या व्यवसायांवर अत्यंत गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.
सध्या पर्यटन हंगामाचे काहीच दिवस शिल्लक असताना वारंवार वीज जात असल्याने रिसॉर्ट, हॉटेल, होमस्टे आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना ग्राहकांच्या नाराजीला आणि रोषाला सामोरे जावे लागत आहे.
अनेक पर्यटक यामुळे पुन्हा या भागात येण्यास टाळाटाळ करत असल्याने भविष्यात पर्यटन व्यवसायाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच सततच्या वीज जाण्यामुळे फ्रीज, एसी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होऊन व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
या समस्येबाबत महावितरण कार्यालयाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही फोन उचलले जात नाहीत आणि समाधानकारक प्रतिसाद दिला जात नसल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे.
नागरिकांच्या तक्रारींकडे प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. या गंभीर समस्येकडे आमदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन सुरळीत वीजपुरवठा सुरू करावा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावर तातडीने उपाययोजना न केल्यास सर्व नागरिक आणि हॉटेल व्यावसायिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

