दापोली (वार्ताहर): करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये १६ ऑगस्ट रोजी स्ट्रेस मॅनेजमेंट शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या निमित्ताने सीबीएसईच्या पुणे विभागाचे रिजन ऑफिसर राधाकृष्ण बलानी यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. या स्ट्रेस मॅनेजमेंट कार्यशाळेत सीबीएसईचे तज्ञ मार्गदर्शक सुजय मेहता आणि प्रदीप पाणीग्रही यांनी शिक्षकांना संबोधित केले.

या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्याच्या सिटी कोऑर्डिनेटर आणि माने इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल सुमन अरोरा, रत्नागिरीतील सर्वंकष विद्यालयाच्या प्रिन्सिपल मोनिका जयस्वाल, फातिमा कॉन्व्हेंट स्कूलच्या प्रिन्सिपल सिल्विया, चिपळूण येथील यश अकॅडमीच्या प्रिन्सिपल समिधा चव्हाण, खेड येथील समर्थ कृपा स्कूलचे प्रिन्सिपल सय्यद अली आणि दापोलीतील रामराजे इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल शेखर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सीबीएसई शाळांमधील ३७ शिक्षक उपस्थित होते. रिजन ऑफिसर राधाकृष्ण बलानी यांना ग्रामीण भागातील शाळांना भेटी देण्याची विशेष आवड असल्याने, त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षकांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने संवाद साधला आणि आदर्श विद्यार्थी घडवण्याचे आवाहन केले.

संस्थेचे अध्यक्ष सुजय मेहता यांनी शिक्षकांसाठी तणावमुक्त शिक्षक कक्ष कसा तयार करता येईल, याविषयी सेंट्रल बोर्डाकडून मार्गदर्शन मिळण्याची विनंती रिजन ऑफिसर यांच्याकडे केली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन प्रिन्सिपल रितू मेहता यांनी केले. ही कार्यशाळा अत्यंत उत्साहात संपन्न झाल्याची भावना सहभागी शिक्षकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.