रत्नागिरी: रत्नागिरीत पार पडलेल्या ७२ व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या आझाद जैनवालने ‘भारत श्री’ या मानाच्या किताबावर आपले नाव कोरले आहे.

उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीने खातू नाट्य मंदिर येथे १ आणि २ मे रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातून आलेल्या खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.

दोन दिवस चाललेल्या या चुरशीच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले.

आझाद जैनवालने मुख्य ‘भारत श्री’ किताबासह ‘भारत क्लासिक फिजिक्स सिनियर’ हे पददेखील मिळवले. मध्य प्रदेशच्या आसिफ मुसा याला ‘भारत उदय’ तर चंद्रभान धुर्ये याला ‘भारत किशोर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

महाराष्ट्राच्या गौरव तेलीने ‘भारत कुमार’ आणि मध्य प्रदेशच्या करण कुमारने ‘भारत केसरी’ किताब जिंकला.

इतर गटांमध्ये महाराष्ट्राच्या आदित्य चळपीवारने ‘भारत मेन्स फिजिक्स ज्युनियर’ आणि रत्नागिरीच्या सुरज पाटणेने ‘भारत मेन्स फिजिक्स सिनियर’ गटात यश मिळवले.

नवाझ शेखने ‘भारत क्लासिक फिजिक्स ज्युनियर’ तर निखिल त्रिवेदीने ‘भारत जीन मॉडेल’ किताबावर ताबा मिळवला.

या सोहळ्यासाठी आयएफबीएफचे जनरल सेक्रेटरी बी. कृष्णराव, स्पर्धाप्रमुख वीरेंद्र वणजु, सदानंद जोशी, बाळू साळवी, नित्यानंद भुते, जितेंद्र नाचणकर यांसह विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावरील पंचांनी या स्पर्धेचे परीक्षण केले असून, रत्नागिरीकर प्रेक्षकांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.