सुभाष शिर्के/मुंबई :
रणदिवे साहेबांची पहिली ओळख दैनिक आपलं महानगरच्या वेळी झाली. क्रिकेटपटू संदीप पाटील च्या गॅरेज मध्ये तेव्हा महनगरचं ऑफिस होतं. सुबोध वळणदार अक्षरात हातानं लिहिलेली कॉपी घेवून रणदिवे साहेब यायचे. त्यांच्या कॉपी मधलं एक पॅरा काय एक ओळ सुद्धा कापली जाणं हा त्यांना प्रचंड अपमान वाटायचा. रात्रपाळीत काम करताना मला त्यांच्या लेखातील काही ओळी कापाव्या लागल्या. त्यावरून काही दिवस त्यांनी बोलणं टाकून दिलं होतं. नंतर दोन दिवसांनी त्यांचा राग मावळला. आपल्या सोर्सेस वर आणि माहिती वर ठाम असणं आणि ते छापून आणताना तडजोड न करणं हे त्यांच्या कडून शिकता आलं.
त्यांचं घर म्हणजे वर्तमान पत्राचं एक संग्रहालय होतं. चार ही बाजूला वर्तमान पत्राचे गठ्ठे भिंतीचा आधार घेऊन निवांत पडलेले असत. या वर्तमान पत्राच्या ढिगाऱ्यात जमिनीवर बसूनच लिहिणारी रणदिवे साहेबांची बटू मूर्ती हे दृश्य नेहमी पाहायला मिळे. तेव्हा गूगल भाई नव्हता. त्यामुळे संदर्भासाठी ही वर्तमान पत्र साहेबांना उपयोगी पडत. पत्रकारिता हा त्यांचा श्वास होता. निर्भिड पणे आणि कुणाची तमा न बाळगता त्यांनी आपला श्वास जपला.
महाराष्ट्र टाईम्स मधून रिटायर झाले तरी त्यांनी आपले सोर्स जपले होते. १९९२ मध्ये शेयर दलाल हर्षद मेहता याच्या घोटाळ्याची बातमी पहिल्यांदा त्यांनी दिली होती. महानगर मध्ये छापून आली होती. कदाचित छोटा पेपर असल्यामुळे त्याची दखल तेव्हा घेतली गेली नाही. त्यानंतर तीन दिवसांनी सुचेता दलाल यांनी हीच बातमी टाईम्स मध्ये छापली आणि पुढचा इतिहास सगळ्यांना माहित आहे.
राजकीय नेते कुणाचे नसतात. तुमचा पेपर किती महत्वाचा आहे हे जाणून तुमच्या शी संपर्क ठेवतात. त्यामुळे मी अमुक नेत्याला चांगला ओळखतो म्हणणारे पत्रकार स्वतः ला फसवत असतात असं ते सांगायचे. त्यासाठी एका नावाजलेल्या पत्रकाराचे उदाहरण द्यायचे. त्याकाळच्या एका वरिष्ठ नेत्याशी या पत्रकाराची चांगली मैत्री होती. काही कारणानं या पत्रकाराला ते वर्तमान पत्र सोडून द्यावं लागलं. नंतर याच नेत्याच्या पत्रकार परिषदेस संबंधित पत्रकार गेला तेव्हा त्या नेत्याने त्याला पाहून न पाहिल्या सारखं केलं. हा किस्सा कायम लक्षात राहिला.
दिनू रणदिवे साहेब कर्तृत्वाने महान होते. उमेदीच्या काळात त्यांना भेटून काही गोष्टी शिकता आल्या हे भाग्य.पत्रकारितेतील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले.
विनम्र आदरांजली!