दापोली : राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाला भेट देऊन लांजा आणि राजापूर तालुक्यातील शेतीच्या विकासासंदर्भात विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, स्थानिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी आणि कोकणातील पारंपरिक फळबागांचे जतन होऊन शेती क्षेत्राला नवी दिशा मिळावी, हा या भेटीमागील प्रमुख उद्देश होता.

लांजा आणि राजापूर तालुक्यांमध्ये शेतीला मोठी परंपरा असून या भागातील भौगोलिक परिस्थिती, मातीचा पोत, हवामान आणि उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती लक्षात घेता उत्पादनवाढीसाठी मोठ्या संधी आहेत.
या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जोड देणे, जमिनीची सुपीकता तपासण्यासाठी माती परीक्षणाला प्रोत्साहन देणे, पारंपरिक फळबागांचे जतन व संवर्धन करणे तसेच शेतीमालाच्या उत्पादनात आणि गुणवत्तेत वाढ करणे या विषयांवर यावेळी सविस्तर विचारविनिमय झाला.

विशेषतः आंबा, काजू आणि इतर फळपिकांच्या बागांचे योग्य व्यवस्थापन, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, जमिनीच्या आरोग्यानुसार पिकांचे नियोजन आणि कृषी विद्यापीठाच्या संशोधनाचा प्रत्यक्ष लाभ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला.
माती परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीतील पोषक घटकांची अचूक माहिती मिळाल्यास शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतीची उत्पादकता वाढविणे शक्य होईल.
तसेच स्थानिक पातळीवरील फळबागांचे जतन केल्यास कोकणातील पारंपरिक शेतीला नवसंजीवनी मिळण्यास मदत होईल, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

कोकण कृषी विद्यापीठातील उपलब्ध संशोधन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि कृषीविषयक तांत्रिक सहकार्य राजापूर व लांजा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी विद्यापीठ आणि स्थानिक शेतकरी यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीनेही चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान विद्यापीठ अभियंता राहुल घाडगे, शिक्षण संचालक डॉ. नारखेडे, वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अजय राणे, डॉ. एस. डी. देसाई, वाकवली येथील मध्यवर्ती संशोधन केंद्राचे संचालक डॉ. अरुण माने, गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उद्योजक सचिन पाकळे व अन्य संबंधित उपस्थित होते.

Leave a Reply