दापोली : तालुक्यातील गावतळे बाजारपेठेत सलूनमध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकावर एका मद्यधुंद तरुणाने पाठीमागून लाकडी पट्टीने (रीप) हल्ला केल्याची घटना गुरुवारी (१९ नोव्हेंबर २०२६) दुपारी घडली. या मारहाणीत संबंधित व्यावसायिक जखमी झाला असून, याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावतळे हनुमानवाडी येथील रहिवासी असलेला शुभम संतोष शिंदे (वय ३०) याचा गावतळे बाजारपेठेत सलूनचा व्यवसाय आहे. यापूर्वी १५ नोव्हेंबर रोजी गावातीलच सौरभ भार्गूराम म्हाब्दी याने मद्य प्राशन करून शुभमचे वडील संतोष धोंडू शिंदे यांना केस कापण्यास भाग पाडले होते आणि पैसे न देण्याची धमकी दिली होती, असे तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेनंतर गुरुवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास शुभम शिंदे दुकानात एका ग्राहकाची दाढी करत असताना सौरभ म्हाब्दी पुन्हा मद्यधुंद अवस्थेत तेथे आला. शुभम बेसावध असताना सौरभने पाठीमागून हातातील लाकडी पट्टीने त्याच्यावर हल्ला चढवला.

या हल्ल्यात शुभम शिंदेच्या डोक्याला, पाठीच्या डाव्या बाजूला आणि हाताला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. यावेळी आरोपी सौरभ म्हाब्दीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर गावातील प्रकाश पवारने जखमी शुभमला दुचाकीवरून गावतळे येथील खाजगी डॉक्टर पवन बयास यांच्याकडे प्राथमिक उपचारासाठी नेले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शुभम शिंदेने दिलेल्या लेखी तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात आरोपी सौरभ म्हाब्दीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ११८(१), ३५१(२) आणि ३५२ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार साक्षी संदीप गुजर करत आहेत. दरम्यान, सौरभ म्हाब्दी मागील काही महिन्यांपासून गावतळे परिसरात मद्यधुंद अवस्थेत वादविवाद घालून आणि नागरिकांना धमक्या देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरल्याची चर्चा आहे.

Leave a Reply