दापोली : कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा जीव दापोली बस आगाराच्या एका मद्यधुंद चालकामुळे धोक्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दापोली आगाराच्या या अजब आणि बेजबाबदार कारभारामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मद्यप्राशन केलेल्या या कर्मचाऱ्यामुळे बस तब्बल चार तास एकाच ठिकाणी थांबवून ठेवावी लागली.
यामुळे वारीसाठी निघालेल्या भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. चार तासांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रशासनाने बदली चालक उपलब्ध करून दिल्यावर बस मार्गस्थ होऊ शकली.
या संपूर्ण प्रकारामुळे एसटी प्रशासनाच्या प्रवासी सुरक्षिततेवर आणि नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच दापोली भाजपने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट एसटी प्रशासनाला जाब विचारत प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या चालकावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.
प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि कारवाईची मागणी करण्यासाठी यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, तालुका सरचिटणीस संदीप केळकर, विवेक भावे, अजय कदम, सोशल मीडिया संयोजक बापू लिंगावळे, ओंकार जोशी, ओंकार वेल्हाळ, वीरू लिंगावळे, प्रमोद पांगारकर आणि मयुरेश वेल्हाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply