रत्नागिरी : शहरातील शाळांमध्ये चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा झेप फाउंडेशनच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवणे, शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सक्षम करणे आणि समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे हेच झेप फाउंडेशनचे ध्येय असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगरसेविका आणि फाउंडेशनच्या कोषाध्यक्षा वर्षा ढेकणे यांनी यावेळी केले.

आजचा विद्यार्थी उद्याचा सक्षम नागरिक असून त्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करून उच्च पदावर विराजमान व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच शैक्षणिक कार्यात कोणतीही अडचण आल्यास फाउंडेशन सदैव सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शंकर जाधव उपस्थित होते. व्यासपीठावर पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वेल्हाळ, झेप फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम ऊर्फ दादा ढेकणे, सचिव सुनील पवार, उपाध्यक्ष सचिन गांधी, सदस्य रुपेश खेडेकर, प्राजक्ता महादये आणि प्रणाली मेस्त्री उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष दादा ढेकणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर सचिव सुनील पवार यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. शंकर जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व विशद केले.

यशस्वी होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी परीक्षेला सामोरे जावे लागते, त्यासाठी विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन वाढवावे आणि पालकांनी पाल्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडू द्यावे, असे आवाहन जाधव यांनी केले.

मुख्याध्यापिका वेल्हाळ यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना संस्थेने देश-विदेशात आपल्या कार्याचा ठसा उमटवावा, अशी सदिच्छा व्यक्त केली.

मान्यवरांच्या मनोगतानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पटवर्धन हायस्कूलचे शिक्षकेतर कर्मचारी प्रदीप जोशी यांचाही सहकार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संतोष वाळिंबे यांनी केले, तर सुनील पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष दादा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.