दापोली : येथील रामराजे महाविद्यालयात पार पडलेल्या ‘रानमाया २०२६’ या प्रदर्शनात कोकणातील समृद्ध निसर्गपरंपरा आणि पौष्टिक रानभाज्यांचे अनोखे दर्शन घडले.
गेल्या अकरा वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रदर्शनात यंदाही ४५ हून अधिक रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थांचा समावेश होता.
या प्रदर्शनासाठी ‘नाणीचो वाडो’ कृषी पर्यटन, कुडाळ, सिंधुदुर्गचे संस्थापक स्मितेश तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तसेच दापोलीचे कृषी अधिकारी हेमंत ठोंबरे, रामराजे महाविद्यालयाचे संस्थापक संदीप राजपुरे, जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, मनसेचे जिल्हा सचिव सचिन गायकवाड, पंचायत समिती सदस्य निलेश शेठ, उपसभापती नम्रता तोडणकर, संस्थेच्या अध्यक्षा स्मिताली राजपुरे, प्राचार्य अशोक निर्बाण, स्थानिक व्यवस्थापन समितीचे दीपक हर्डीकर, आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनचे चेअरमन धनंजय यादव, विजय दळवी, मीना रेड्डी, जानकी बेलोसे, रुचिता नलावडे, रेखा जेगरकल, विश्वेश्वरी दरेकर, द फ़र्न समाली हॉटेलचे शेफ मनोज कुमार, पत्रकार शिवाजी गोरे, सलीम रखांगे, अजीत सुर्वे, प्रवीण शिंदे, ज्योती बिवलकर, महेश महाडिक, सुदेश मालवणकर, सुदेश तांबे यांच्यासह जेसीआय दापोलीचे अध्यक्ष कुणाल मेहता, रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप बागायतकर, तसेच विविध क्लबचे सदस्य, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारंगी, टाकळा, कुरडू, कारटोली, चिचाडी, मायाळू, रताळ्याची पाने, प्याव, दार, कुड्याच्या शेंगा, शतावरी आणि थरबरा यांसारख्या रानभाज्या वापरून विद्यार्थ्यांनी आधुनिक पाककलेच्या जोरावर तयार केलेले पदार्थ उपस्थितांचे मुख्य आकर्षण ठरले.
‘रानातून थेट ताटात’ या संकल्पनेतून कोकणच्या मातीतला अस्सल रानमेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या या उपक्रमाचे दापोलीकरांनी मनमोकळे कौतुक केले.
पारंपरिक कोकणी खाद्यसंस्कृती, स्थानिक जैवविविधता आणि आधुनिक पाककलेचा सुंदर संगम साधत रामराजे महाविद्यालयाने पुन्हा एकदा कोकणची परंपरा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

