दापोली : शहरात शेतीच्या कामात वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी आपल्या सजविलेल्या बैलजोड्यांसह मिरवणुकीत सहभागी झाले असून ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक सजावट आणि बैलांप्रतीचा जिव्हाळा यामुळे दापोली शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

जालगाव ब्राह्मणवाडीचे प्रगतशील शेतकरी गजानन कांबळे तसेच तालुक्यातील शेतकरी संघटनेचे अनेक शेतकरी आपल्या बैलांसह या मिरवणुकीत सहभागी झाले होते. सकाळपासून बैलांना स्वच्छ अंघोळ घालून, अंगावर आकर्षक झूल चढवून, शिंगांना रंग व फुलांची सजावट करून त्यांना सजविण्यात आले.

त्यानंतर दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी साडेसहापर्यंत दापोली शहरातून बैलांची दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. बैलपोळा हा केवळ उत्सव नसून शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे.

वर्षभर शेतात नांगरणी, पेरणी, मशागत अशा विविध कामांत शेतकऱ्याला साथ देणाऱ्या या मूक प्राण्यांप्रती प्रेम, आदर आणि संवेदना व्यक्त करण्याची ही परंपरा आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीत बैलपोळ्याला विशेष महत्त्व असून या दिवशी बैलांना कामातून विश्रांती देऊन त्यांची पूजा केली जाते. आज शेतीमध्ये आधुनिक यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे म्हणजेच एआयचे युग आले असले, तरी शेतकरी आणि बैल यांच्यातील भावनिक नाते आजही कायम आहे.

बदलत्या काळात शेतीचे स्वरूप बदलत असले तरी आपल्या ग्रामीण संस्कृतीशी जोडलेली ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत जपणे गरजेचे आहे. या मिरवणुकीत जालगाव पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, जालगावचे सरपंच अक्षय फाटक, अनिल भांबिड, संबंधित महिला, महेश पवार यांच्यासह अनेक शेतकरी व बैलप्रेमी सहभागी झाले होते.

बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा नाद, ढोल-ताशांचा गजर आणि रंगीबेरंगी सजविलेल्या बैलजोड्यांनी दापोली शहराचे वातावरण भारावून टाकले असून मूक प्राण्यांप्रती प्रेम, कृतज्ञता आणि संवेदना जपणारा हा पारंपरिक सण नव्या पिढीलाही आपल्या कृषी संस्कृतीशी जोडणारा ठरला आहे.