दापोली : आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून १९ सप्टेंबर रोजी कर्दे ग्रामपंचायतीच्या वतीने कर्दे समुद्रकिनारा स्वच्छता अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्वच्छता अभियानामध्ये कर्दे येथील स्थानिक ग्रामस्थ, मुंबईहून आलेले ग्रामस्थ तसेच कर्दे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी उपलब्ध असलेली समुद्रकिनारा स्वच्छता मशीन या उपक्रमासाठी विशेषत्वाने वापरण्यात आली. जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी ही मशीन उपलब्ध करून दिल्याने ग्रामपंचायतीकडून त्यांचे आभार मानण्यात आले.
या अभियानाचे उद्घाटन कर्दे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी, ग्रामसेवक, माजी सरपंच सचिन तोडणकर, पंचायत समितीच्या स्वच्छता विभाग कर्मचारी पूजा देवकर आणि स्थानिक ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी माजी सरपंच सचिन तोडणकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि संपूर्ण आठवडा स्वच्छता सप्ताह म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले.
या अभियानात सक्रिय सहभागी होऊन कर्दे समुद्रकिनारा स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व स्थानिक व मुंबईकर ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीच्या वतीने कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

