रत्नागिरी : जिल्ह्यातील चिपळूणमध्ये महसूल विभागातील भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी आणि जाणीवपूर्वक रद्द केलेली फेरफार नोंद मंजूर करण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच घेताना चिपळूणचे मंडळ अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के (वय ५२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज सायंकाळी रंगेहात पकडले.
मुंबई-गोवा महामार्गावरील पाग नाका, पॉवर हाऊस परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली असून महिनाभरात चिपळूण तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यावर झालेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.
तक्रारदाराने मौजे चिपळूण येथे भूमापन क्रमांक १७४/१अ ही जागा खरेदी केली होती. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर स्वतःचे व पत्नीचे नाव दाखल होऊन फेरफार मंजूर होण्यासाठी त्यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता.
त्यानुसार ११ जून २०२६ रोजी फेरफार नोंद घालण्यात आली, मात्र लाचेच्या लालसेने मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के याने ८ जुलै रोजी ही नोंद अधिकाराचा गैरवापर करत रद्द केली.
त्यानंतर २ ऑगस्ट रोजी महसूल कर्मचारी पतसंस्थेत राजेशिर्के याची भेट घेतली असता, त्याने रद्द झालेली नोंद पुन्हा मंजूर करण्यासाठी थेट दहा हजार रुपयांची मागणी केली.
लाचेच्या रकमेसाठी त्याने २३ व २७ ऑगस्ट रोजी फोनवरून फेरफार मंजूर केल्याचे सांगत पैशांसाठी तगादा लावला. मात्र, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे दार ठोठावले.
एसीबीने तातडीने दखल घेत २ सप्टेंबर रोजी भोगाळे येथील दीपक लॉजसमोर तक्रारदाराच्या गाडीत पंचांसमक्ष पडताळणी केली असता लाचेची मागणी निष्पन्न झाली.
त्यानंतर सायंकाळी ६:०५ वाजता पाग नाका परिसरातील हायवेवर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराच्या गाडीत निर्ढावलेल्या अवस्थेत दहा हजारांची रोख लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने राजेशिर्के याच्या मुसक्या आवळल्या.
याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ५ ऑगस्ट रोजीच सावर्डे येथील मंडळ अधिकारी अनिल दिलीप जाधव याला पाच हजारांची लाच घेताना पकडण्यात आले होते.
महिनाभरातच आता राजेशिर्के जाळ्यात अडकल्याने महसूल प्रशासनातील भ्रष्ट साखळी उघड झाली आहे. ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे आणि अंमलदार उदय चांदणे, संजय वाघाटे, जनार्दन पवार, आशिष बल्लाळ, श्रेया विचारे, हेमंत राजेश गावकर, समिता क्षिरसागर व अजिंक्य पवार यांच्या पथकाने केली.
कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ७०३८३९१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर निर्भयपणे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

