खेड (रत्नागिरी): खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या अधिकृत मान्यतेचा प्रश्न आणि व्यवस्थापनाच्या कथित कारभाराविरोधात पालक अनुज जोशी यांनी दोन सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
आपल्या मुलीच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद करत जोशी यांनी हे आंदोलनात्मक पाऊल उचलले असून, शिक्षण विभागाने शाळेच्या एकूणच कारभाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी लावून धरली आहे.

शाळेकडून कथित बोगस पावत्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्ते अनुज जोशी यांनी केला आहे. संबंधित शाळेला शासनाची रीतसर मान्यता असल्यास त्याचे अधिकृत पुरावे जाहीर करण्यात यावेत, अशी मागणी करत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
यापूर्वी पंधरा ऑगस्ट रोजी जोशी यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थी व विनंतीनंतर ते उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.
प्रशासनाने योग्य चौकशी व कारवाई न केल्यास दोन सप्टेंबरपासून पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
त्यानुसार, शिक्षण विभागाकडून ठोस कारवाई न झाल्याचा दावा करत अनुज जोशी यांनी अखेर बेमुदत धरणे आंदोलनाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सत्य समोर आणावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्याकडून मांडण्यात येत आहे.

