रत्नागिरी : पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत देशातील सर्वोत्तम पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाली आहे.
त्यांच्या संकल्पनेतून आणि दूरदृष्टीतून साकारलेल्या ‘रेड्स’ (RAIDS) या अत्याधुनिक अॅपचे नुकतेच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत सादरीकरण करण्यात आले.
या अॅपच्या माध्यमातून अज्ञात आणि बेवारस मृतदेहांची माहिती एकत्रितपणे संकलित केली जाते. मृतदेहांची उपलब्ध छायाचित्रे आणि इतर माहितीच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम या अॅपद्वारे होते.
मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असली आणि चेहरा ओळखणे कठीण असले, तरीही उपलब्ध माहितीवरून संभाव्य चेहरा पुनर्निर्मित करून ओळख पटवण्यास यामुळे मोठी मदत मिळते. तसेच, बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी एकाच चेहऱ्याची १०८ विविध रूपे तांत्रिक पद्धतीने तयार करून त्यांचा शोध घेतला जातो.
या अॅपच्या माध्यमातून आतापर्यंत १५३ बेवारस मृतदेहांची नोंद करण्यात आली आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील १३५ बेवारस व कुजलेल्या मृतदेहांच्या चेहऱ्यांच्या एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल प्रतिकृती तयार करण्यात आल्या असून, त्यापैकी १४ प्रकरणांमध्ये मृतदेहांची यशस्वी ओळख पटली आहे.
जिल्ह्याबाहेरील १९ बेवारस मृतदेहांपैकी ७ प्रकरणांची उकल करण्यातही या अॅपमुळे यश आले आहे. याव्यतिरिक्त, अॅपमध्ये एकूण ३८१ बेपत्ता व्यक्तींची नोंद असून, जिल्ह्यातील ११ बेपत्ता व्यक्तींच्या चेहऱ्यांच्या डिजिटल प्रतिकृती तयार करून त्यांचा यशस्वी शोध घेण्यात आला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अज्ञात मृतदेहांची ओळख पटवणारे आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणारे हे अॅप रत्नागिरी पोलीस दलाच्या नाविन्यपूर्ण व तंत्रज्ञानाधिष्ठित कार्याचे उत्तम उदाहरण ठरले असून, याच कामगिरीची दखल घेत नितीन बगाटे यांना हा राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे.

