मुंबई: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन जवळपास दोन वर्ष झाल्यानंतर अखेर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला असून शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी या स्पर्धेत बाजी मारली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले असून, गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याच आदेशाद्वारे नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमतानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती.

रायगडमध्ये भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या नेत्या तथा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यात या पदासाठी थेट संघर्ष पाहायला मिळाला.

रायगड हा शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील पारंपरिक राजकीय संघर्षाचा बालेकिल्ला राहिला असल्याने, गोगावले यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी तटकरे यांच्या पालकमंत्रिपदाच्या दाव्याला तीव्र विरोध दर्शवला होता.

गोगावले यांनी सुरुवातीपासूनच या पदावर आपला हक्क कायम ठेवत आक्रमक भूमिका घेतली होती.

दोन वर्षांपासून रखडलेला हा तिढा अखेर नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीतील राजकीय तडजोडीनंतर सुटला. या निवडणुकीत महायुतीकडून उमेदवारीसाठी राष्ट्रवादीने खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्यासाठी, तर शिवसेनेकडून भरत गोगावले यांच्या मुलासाठी दावा करण्यात आला होता.

अखेर शिवसेनेने ही जागा अनिकेत तटकरे यांच्यासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या बदल्यात भरत गोगावले यांनी रायगडचे पालकमंत्रिपद आपल्या पदरात पाडून घेत जिल्ह्यात आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले.